Join us  

दीड दिवसांत ४० विकेट्स! गोलंदाजांचा कहर, ७ धावांवर ६ विकेट्स गमावणाऱ्या संघाने मारली बाजी  

इंग्लंडमध्ये सुरू असलेल्या कौंटी चॅम्पियनशीप ( County Championship ) स्पर्धेत दीड दिवसात आज एक सामना संपला. दोन्ही संघांचे दोन्ही डाव दीड दिवसांत गडगडले.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 21, 2022 8:18 PM

Open in App

इंग्लंडमध्ये सुरू असलेल्या कौंटी चॅम्पियनशीप ( County Championship ) स्पर्धेत दीड दिवसात आज एक सामना संपला. दोन्ही संघांचे दोन्ही डाव दीड दिवसांत गडगडले. लँकाशर ( Lancashire) आणि एसेक्स ( Essex) यांच्यातल्या सामन्यात अजब विक्रम झाला. लँकाशर संघाने ३८ धावांनी हा सामना जिंकताना एसेक्सचा दुसरा डाव ५९ धावांवर गुंडाळला. ९८ धावांचे लक्ष्यही त्यांना पार करता आले नाही. लँकाशरचा गोलंदाज जॉर्ज बाल्डरसन ( ५ विकेट्स) आणि विल विलियम्स ( ४ विकेट्स) यांनी एसेक्सला धक्का दिला.  

गोलंदाजांना मदत करणाऱ्या खेळपट्टीवर पहिल्याच दिवशी २६ विकेट्स पडल्या. दोन्ही संघांचा एक-एक डाव पूर्ण झाला आणि लँकाशरची दुसऱ्या डावात ६ बाद ७ धावा अशी दयनीय अवस्था झाली. प्रशिक्षक ग्लेन चॅपेलने या खेळपट्टीवर नाराजी व्यक्त केली. लँकाशरने २० सप्टेंबरला टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. पण, सायमन हार्मरने ४१ धावांत पाच विकेट्स घेताना लँकाशरचा डाव १३१ धावांत गुंडाळला. लँकाशरकडून नवव्या क्रमांकावर आलेल्या टॉम बेलीने सर्वाधिक २४ धावा केल्या. एसेक्सकडून एलिस्टर कूकने ४० धावांची खेळी केली, परंतु त्यांचा डाव १०७ धावांत गडगडला. लँकाशरच्या टॉम बेलीने ३६ धावांत पाच विकेट्स  घेतल्या. 

लँकाशरने पहिल्या डावात २४ धावांची आघाडी घेतली. दुसऱ्या डावातही त्यांचा डाव ७३ धावांवर गडगडला. एककाळ त्यांचा डाव ६ बाद ७ धावा असा गडगडला होता, पण, जॉर्ज बेल ( २४) व टॉम हार्टली ( २३) यांनी डाव सावरला. स्टेनरने १० धावा देत ६ विकेट्स गेतल्या. एसेक्सला विजयासाठी ९८ धावा करायच्या होत्या, परंतु त्यांचा संपूर्ण संघ २२.२ षटकांत ५९ धावांत माघारी परतला.  एलिस्टर कुक ( १४) व कर्णधार टॉम वेस्टली ( १३) धावा केल्या. १९८०नंतर कौंटी अजिंक्यपद स्पर्धेत सर्वात कमी ३७० धावांत ४० विकेट्स पडण्याची ही पहिलीच वेळ. यापूर्वी एसेक्स व केंट यांच्यातल्या सामन्यात दोन्ही संघांनी मिळून ३६२ धावा केल्या होत्या.  

 

टॅग्स :कौंटी चॅम्पियनशिपइंग्लंड
Open in App