नवी दिल्ली : पाकिस्तानी संघाचा अनुभवी खेळाडू शोएब मलिकनेपाकिस्तानी संघातून पुन्हा एकदा खेळण्याची इच्छा व्यक्त केली आहे. पाकिस्तानकडून खेळून चांगले प्रदर्शन करण्याची क्षमता असल्याचे त्याने म्हटले. खरं तर 40 वर्षीय शोएबने आपला फिटनेस अद्याप चांगला असल्याचे सांगत आंतरराष्ट्रीय संघातील पुनरागमनावर भाष्य केले. शोएब मलिक सध्या बांगलादेश प्रीमियर लीगमध्ये (BPL) रंगपूर रायडर्सकडून खेळत आहे. यादरम्यान सिल्हेट आंतरराष्ट्रीय मैदानावर पत्रकारांशी बोलताना त्याने सांगितले की, "मी क्रिकेट खेळत राहीन आणि म्हणूनच मी सध्या निवृत्तीचा विचारही करत नाही."
मला अजून धावांची भूक आहे - शोएब मलिक शोएब मलिकने आणखी म्हटले की, "खरं सांगायचे तर मी संघातील सर्वात वयस्कर खेळाडू आहे, पण तुम्ही माझ्या फिटनेसची तुलना कोणत्याही 25 वर्षीय खेळाडूशी करू शकता. मला वाटते की मला प्रेरणा मिळते की मी अजूनही बाहेर जाऊन मोठी धावसंख्या करू शकतो. मला अजूनही धावा करण्याची भूक आहे. मी यापुढेही क्रिकेट खेळत राहीन आणि मी निवृत्तीचा अजिबात विचार करत नाही." तसेच शोएब मलिकने हे देखील सांगितले की, तो शारीरिक तंदुरुस्ती चाचणीत कोणत्याही खेळाडूला खुले आव्हान देऊ शकतो.
"मी आंतरराष्ट्रीय क्रिकेट आणि सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून सोबतच निवृत्ती घेईन. पण, आताच्या घडीला मी फक्त याचा आनंद घेत आहे. जर मला संधी मिळाली तर नक्कीच पाकिस्तानी संघातून खेळेन. मी या आधीच कसोटी आणि वन डे क्रिकेटमधून संन्यास घेतला आहे. मात्र, ट्वेंटी-20 क्रिकेटसाठी अद्याप उपलब्ध आहे आणि जेव्हा कधी संधी मिळेल तेव्हा शानदार खेळी करण्याचा प्रयत्न करेन", असे अनुभवी खेळाडूने अधिक सांगितले.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"