दुबई : पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने वर्ल्ड कप स्पर्धेत पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यावर बहिष्कार घालावा, अशी मागणी जोर धरत आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने ( बीसीसीआय) याबाबतच्या निर्णयाचा चेंडू केंद्र सरकारच्या कोर्टात भिरकावला, परंतु त्याचवेळी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेवर ( आयसीसी) दडपण निर्माण करण्याचे प्रयत्नही सुरू केले आहे. सूत्रांच्या माहितीनुसार वर्ल्ड कपमधून पाकिस्तान संघाची हकालपट्टी करावी, अशी मागणी बीसीसीआय करणार असल्याचे समजते. त्यामुळे यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये भारत-पाक हा सामना होणार नाही, असेच चित्र रंगवले जात आहे. मात्र, समोर आलेल्या आकडेवारीनुसार हा सामना पाहण्यासाठी स्टेडियमच्या क्षमतेपेक्षा अधिक तिकिटांची मागणी होत आहे.
पुलवामा येथे 14 फेब्रुवारीला दशतवाद्यांनी भ्याड हल्ला केला आणि त्यात भारताचे 40 जवान शहीद झाले. या हल्ल्यानंतर देशात पाकिस्तान विरोधी संतापाची लाट अधिक तीव्र झाली. त्यामुळेच भारताने वर्ल्ड कप स्पर्धेत पाकविरुद्ध खेळू नये, अशा भावना व्यक्त केल्या जात आहेत. पण, 16 जूनला मँचेस्टर येथील ओल्ड ट्रॅफर्ड स्टेडियमवर होणाऱ्या भारत-पाक सामन्याला प्रचंड डिमांड असल्याचे समोर आले आहे. 25 हजार प्रेक्षकांची क्षमता असलेल्या ओल्ड ट्रॅफर्ड स्टेडियमच्या तिकिटांसाठी 4 लाख अर्ज आल्याची माहिती आयसीसीचे वर्ल्ड कप स्पर्धा संचालक स्टीव्ह एलवर्थी यांनी दिली आहे.
ते म्हणाले,''भारत आणि पाकिस्तान यांचा सामना प्रत्यक्ष पाहण्यासाठी आमच्याकडे 4 लाखांहून अधिक अर्ज आले आहेत. ही आकडेवारी थक्क करणारी आहे. ओल्ड ट्रॅफर्ड स्टेडियमची क्षमता 25000 आहे. त्यामुळे अनेकांना रिकामी हातानं परतावं लागेल. ऑस्ट्रेलिया वि. इंग्लंड आणि अंतिम सामन्यालाही एवढी मागणी नाही. इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया सामन्याला 2.30 ते 2.40 लाख तिकिटांची, तर अंतिम सामन्यासाठी 2.60 ते 2.70 लाख तिकिटांची मागणी आहे.''
दरम्यान, भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुली म्हणाला,'' वर्ल्ड कप स्पर्धेत पाकविरुद्ध न खेळल्यानं भारताला फार फरक पडणार नाही. वर्ल्ड कप स्पर्धेत दहा संघ सहभागी होणार आहेत आणि प्रत्येक संघ एकमेकांविरुद्ध खेळेल. पण, भारताने पाकिस्तानविरुद्धचा एक सामना खेळला नाही, तर फार फरक पडणार नाही. भारतीय संघाशिवाय वर्ल्ड कप घेणं आयसीसीला सोपं जाणार नाही. पण, पाकिस्तानमध्ये कठोर संदेश जाणं गरजेचं आहे.''