नवी दिल्ली-
दोन पारंपारिक प्रतिस्पर्धी भारत आणि पाकिस्तान यांच्यात संयुक्त अरब अमिरातीत पहिला सामना ४१ वर्षांपूर्वी शारजाहमध्ये झाला होता. तीन एप्रिल १९८१ मध्ये झालेल्या या सामन्यात या लढतीत शारजाहमध्ये गवताची खेळपट्टी उपलब्ध नव्हती. त्यामुळे या सामन्यात सिमेंटच्या पिचचा वापर करण्यात आला होता. त्यात सुनील गावसकर हे भारतीय तर जावेद मियाँदाद हे पाकिस्तान संघाचे नेतृत्व करत होते.
दोन लाख डॉलर बक्षिसाची रक्कम असलेली ही लढत क्रिकेटर्स बेनिफिट फंड सिरीज या बॅनरखाली घेण्यात आली होती. त्यात शारजहाच्या अब्दुल रहमान बुखारी यांनी पाकिस्तानचे फलंदाज हनीफ मोहम्मद यांच्या साहाय्यासाठी याचे आयोजन केले होते. बुखारी आणि पाकिस्तानी फलंदाज आसिफ इक्बाल यांनी भारत आणि पाकिस्तानच्या खेळाडूंशी चर्चा केली होती. या सामन्याला शारजहाच्या मैदानावर खेळला गेलेला पहिला आंतरराष्ट्रीय सामनादेखील म्हटले जाऊ शकते.
या स्पर्धेसाठी जाहिरातदेखील करण्यात आल्या होत्या. तर सामन्याचा आनंद घेण्यासाठी ८ हजार प्रेक्षक जमले होते. सामना हा अत्यंत कंटाळवाणा ठरला होता. गावसकर यांच्या संघानं फक्त १३९ धावा केल्या होत्या. तर मियाँदाद यांच्या संघाने सहज हे लक्ष्य गाठले होते. दिवंगत तस्लीम आरीफ हे सामनावीर ठरले होते. तर गावसकर यांनी सर्वाधिक धावा केल्या होत्या. त्यांना बक्षिसाच्या रुपाने टेलिव्हिजन सेट देण्यात आला होता. सामन्याचे यश पाहता प्रत्येक वर्षी असा एक सामना आयोजित करण्याची योजना बनवण्यात आली. पुढच्याच वर्षी भारत-पाक यांच्यात दोन सामने आयोजित करण्यात आले. नंतर भारतीय उपखंडात आशियाई क्रिकेट परिषदेची स्थापना करण्यात आली. भारत, पाक आणि श्रीलंका हे त्याच मैदानामध्ये आशिया चषक खेळले. ६ एप्रिल १९८४ मध्ये पाकिस्तान आणि श्रीलंका यांच्यात पहिला सामना शारजहा क्रिकेट असोसिएशन स्टेडियममध्ये अधिकृतपणे घेण्यात आला.
बुखारी यांचे प्रयत्न
शारजहाच्या अब्दुल रहमान बुखारी हे कराचीत एका शाळेत क्रिकेटने मोहित झाले होते. त्यांनी १९७४ ला शारजहा क्रिकेट असोसिएशनची स्थापना केली. फेब्रुवारी १९७६ मध्ये पहिल्यांदा त्यांनी पाकिस्तानी संघाला त्यांनी एक स्थानिक एकादश विरोधात ५० षटकांच्या सामन्यासाठी आमंत्रित केले. ऑक्टोबर १९८० ला बुखारी यांनी दोन लाख चौरस मीटरचा भूखंड खरेदी केला. जोपर्यंत ड्रेसिंग रुम पूर्ण झालेली नव्हती. तेव्हा खेळाडूंना जेवणासाठी शारजहा फुटबॉल क्लबच्या डायनिंग हॉलमध्ये जावे लागत होते.
Web Title: 41 years ago the India Pak match was played on a cement pitch led by sunil gavaskar
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.