Join us  

एका कसोटीसाठी मिळतील ४५ लाख!; बीसीसीआयची प्रोत्साहन योजना सुरू 

ईशान किशन, श्रेयस अय्यर आणि दीपक चाहर यांनी ‘रेड बॉल’ क्रिकेटकडे पाठ फिरविल्यानंतर बोर्डाने ही योजना आणली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 10, 2024 8:36 AM

Open in App

नवी दिल्ली : कसोटी क्रिकेटला प्राधान्य देण्याच्या धोरणाची अंमलबजावणी करीत बीसीसीआय सचिव जय शाह यांनी कसोटीपटूंचे सामना शुल्क १५ लाखांहून ४५ लाख असे केले. एका सत्रात किमान सात सामने खेळणाऱ्या खेळाडूंना याचा लाभ मिळेल. याचा अर्थ, एखादा खेळाडू सत्रात दहा सामने खेळल्यास त्याला साडेचार कोटींची मोठी रक्कम मिळेल. ही रक्कम वार्षिक कराराच्या रकमेपेक्षा वेगळी असणार आहे. २०२२-२३ च्या सत्रात कसोटी क्रिकेटमध्ये सहभागी होणाऱ्या खेळाडूंनादेखील प्रोत्साहन रकमेचा लाभ होणार आहे. ईशान किशन, श्रेयस अय्यर आणि दीपक चाहर यांनी ‘रेड बॉल’ क्रिकेटकडे पाठ फिरविल्यानंतर बोर्डाने ही योजना आणली आहे.

जय शाह यांनी पोस्टमध्ये लिहिले, ‘भारताच्या पुरुष कसोटी संघातील खेळाडूंसाठी ‘कसोटी क्रिकेट प्रोत्साहन योजना’ सुरू करताना मला आनंद होत आहे, आमच्या खेळाडूंना आर्थिक वाढ आणि स्थिरता प्रदान करण्याच्या उद्देशाने एक पाऊल आहे. प्रत्येक सत्रात किमान नऊ कसोटी सामने होतात. खेळाडूंनी त्यातील किमान चार सामने खेळल्यास  त्याला किमान १५-१५ लाख तर राखीव खेळाडूंना अर्धी रक्कम मिळेल. किमान पाच-सहा सामने खेळल्यास अंतिम एकादशमधील खेळाडूला ३० लाख आणि राखीव खेळाडूला १५ लाख मिळतील. सात सामने खेळल्यास त्याला ४५ लाख दिले जातील. राखीव खेळाडूसाठी ही रक्कम २२.५ लाखांची असेल.’

प्रोत्साहन योजनेची वैशिष्ट्ये

सत्रातील ५० टक्क्यांपेक्षा कमी (४ कसोटींहून कमी) सामने खेळले तर अंतिम संघ व राखीव खेळाडूंना प्रोत्साहन रक्कम मिळणार नाही. ५० टक्क्यांपेक्षा अधिक कसोटी सामने (५ ते ६) खेळणाऱ्या  अंतिम संघातील खेळाडूला ३० लाख रुपये प्रति सामना तर राखीव खेळाडूंना १५ लाख रुपये प्रति सामना प्रोत्साहन रक्कम मिळेल. ७५  टक्क्यांपेक्षा अधिक कसोटी सामने (७ पेक्षा जास्त) खेळलेल्या अंतिम संघातील खेळाडूला ४५ लाख रुपये प्रति सामना तर राखीव खेळाडूंना २२.५ लाख रुपये प्रति सामना प्रोत्साहन रक्कम दिली जाईल. 

टॅग्स :बीसीसीआय