बंगळुरू - ऑस्ट्रेलियात झालेल्या टी-२० वर्ल्डकपमध्ये भारतीय संघाचं आव्हान उपांत्य फेरीतच संपल्यामुळे क्रिकेटप्रेमींची निराशा झाली आहे. दरम्यान, देशांतर्गत क्रिकेटमधील एका स्थानिक स्पर्धेत एका १६ वर्षीय फलंदाजाने विक्रमी खेळी केली असून, त्याच्या खेळीची सध्या चर्चा सुरू आहे. या खेळाडूचं नाव आहे तन्मय मंजुनाथ. त्याने कर्नाटकमधील आंतर जिल्हा क्रिकेट स्पर्धेतील वनडे सामन्यात ४०७ धावांची तुफानी खेळी केली आहे.
कर्नाटकमधील शिमोगामधील सागर येथील रहिवासी असलेल्या तन्मय मंजुनाथ याने १६ वर्षांखालील स्पर्धेत ही खेळी करून सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. ५० षटकांच्या या सामन्यात तन्मयने १६५ चेंडून ४०७ धावा कुटल्या. या खेळीदरम्यान, त्याने ४८ चौकार आणि २४ षटकार ठोकले.
या खेळीसह त्याने क्रिकेटमध्ये नवा विक्रम नोंदवला आहे. तन्मय मंजुनाथ हा सागर क्रिकेट क्लबकडून खेळतो. शिमोगामध्ये खेळल्या गेलेल्या ५०-५० षट्कांच्या आंतर जिल्हा स्पर्धेत त्याने ही तुफानी खेळी केली. सागर क्रिकेट क्लबकडून खेळताना तन्मयने भद्रावती एनटीसीसीविरुद्ध ही ४०७ धावांची विक्रम खेळी केली.