Join us  

48 साल बाद... दक्षिण आफ्रिकेचा ऑस्ट्रेलियावर ऐतिहासिक विजय

दक्षिण आफ्रिकेचा हा आतापर्यंतचा सर्वात मोठा विजय आहे. त्याचबरोबर 1970 सालानंतर ऑस्ट्रेलियालाविरुद्ध त्यांनी मायदेशात पहिला कसोटी मालिका विजय साकारला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 03, 2018 5:30 PM

Open in App
ठळक मुद्देचौथ्या कसोटी सामन्यातील विजयासह दक्षिण आफ्रिकेने ही मालिका 3-1 अशी खिशात टाकली आहे.

जोहान्सबर्ग : चौथ्या कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेने ऑस्ट्रेलियावर ऐतिहासिक विजय मिळवला.  दक्षिण आफ्रिकेने ऑस्ट्रेलियापुढे 612 धावांचे विशाल लक्ष्य ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाला फक्त 119 धावाच करता आल्या आणि दक्षिण आफ्रिकेने 492 धावांनी दणदणीत विजय मिळवला. दक्षिण आफ्रिकेचा हा आतापर्यंतचा सर्वात मोठा विजय आहे. त्याचबरोबर 1970 सालानंतर ऑस्ट्रेलियालाविरुद्ध त्यांनी मायदेशात पहिला कसोटी मालिका विजय साकारला आहे. चौथ्या कसोटी सामन्यातील विजयासह दक्षिण आफ्रिकेने ही मालिका 3-1 अशी खिशात टाकली आहे.

दक्षिण आफ्रिकेच्या या विजयात वेगवान गोलंदाज व्हेर्नान फिलँडरने सिंहाचा वाटा उचलला. फिलँडरने दुसऱ्या डावात फक्त 21 धावा देत ऑस्ट्रेलियालाच्या सहा फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवला. फिलँडरची कसोटी कारकिर्दीतली ही सर्वोत्तम कामगिरी आहे. त्याचबरोबर फिलँडरने कसोटी कारकिर्दीत 200 बळीही आपल्या नावावर केले आहेत. पहिल्या डावात त्याने तीन बळी मिळवले होते.

मंगळवारी 3 बाद 88 या धावसंख्येवरून ऑस्ट्रेलियाने सुरुवात केली, पण त्यांना फक्त 16.4 षटकेच खेळता आली. फिलँडरने भेदक मारा करत ऑस्ट्रेलियाला पराभव पत्करण्यास भाग पाडले. दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज मॉर्नी मॉर्केलचा हा अखेरचा कसोटी सामना होता. दक्षिण आफ्रिकेच्या संघाने त्याला विजयाने निरोप दिला.

टॅग्स :क्रिकेटद. आफ्रिकाआॅस्ट्रेलिया