रांची : फिरकी गोलंदाज शोएब बशीर आणि टॉम हार्टले यांनी भारतीय फलंदाजांना फिरकीच्या जाळ्यात अडकविल्यामुळे इंग्लंड संघ चौथ्या कसोटीच्या दुसऱ्या दिवसअखेर शनिवारी पहिल्या डावात आघाडी संपादन करण्याकडे अग्रेसर झाला. भारताने इंग्लंडला ३५३ धावांत रोखले खरे; पण दिवसअखेर यजमानांनीही २१९ धावांत ७ फलंदाज गमावले. त्यामुळे भारतीय संघ अद्याप १३४ धावांनी मागे आहे. यशस्वी जैस्वालने ८ चौकार आणि एका षट्कारासह ७३ धावांची खेळी केली. तर शुभमन गिलने ३८ धावांचे योगदान दिले. यष्टिरक्षक ध्रुव जुरेल नाबाद ३० तर कुलदीप १७ धावांवर नाबाद होता.
युवा खेळाडूंना फिरकीला पूरक खेळपट्टीवर ताळमेळ साधण्यात अपयश आले. भारताची स्थिती एकवेळ ७ बाद १७७ होती. जुरेल- कुलदीप यांनी १७.४ षटके खेळून पडझड रोखली. या दोघांनी आठव्या गड्यासाठी आतापर्यंत ४२ धावांची भागीदारी केली. पहिल्या सत्रात कर्णधार रोहित शर्मा (२) आणि दुसऱ्या सत्रात शुभमन गिल (३८), रजत पाटीदार (१७) तसेच रवींद्र जडेजा (१२) बाद झाले. शोएब बशीर अधिक प्रभावी ठरला. तिसऱ्या सत्रात जैस्वाल, सरफराज खान (१४) आणि रविचंद्रन अश्विन (०१) माघारी परतले. जैस्वालने गिलसोबत दुसऱ्या गड्यासाठी ८२ धावांची भागीदारी केली. दोघेही सहजपणे फलंदाजी करीत होते. तोच ४४ धावांत तीन फलंदाज गमावल्याने भारतीय संघ बॅकफूटवर आला. गिल बशीरच्या चेंडूवर पायचीत झाला. दरम्यान, जैस्वाल ४० धावांवर असताना त्याला प्रतिस्पर्धी कर्णधार बेन स्टोक्सने जीवदान दिले. पाटीदार हादेखील बशीरच्या चेंडूवर पायचीत झाला. बशीरने जैस्वालचाही त्रिफळा उडवीत भारताला मोठा धक्का दिला. पदार्पणात अर्धशतक ठोकणाऱ्या सरफराजला आज धावांसाठी संघर्ष करावा लागला. हार्टलेच्या चेंडूवर रूटने त्याचा झेल टिपला. हार्टलेने अश्विनलादेखील स्थिरावू दिले नाही. बशीरने ८४ धावांत ४ तर टॉम हार्टलेने ४७ धावांत २ गडी बाद केले. ॲन्डरसनने रोहितचा बळी घेतला. त्याआधी, ज्यो रूटने २७४ चेंडूतील १० चौकारांसह काढलेल्या नाबाद १२२ धावांनंतरही इंग्लंडचा पहिला डाव ३५३ धावांत आटोपला.
मालिकेत ६०० धावा; यशस्वी ५ वा भारतीय! एका मालिकेत ६००वर धावा काढणारा यशस्वी जैस्वाल हा पाचवा भारतीय फलंदाज ठरला. त्याने सुनील गावसकर, विराट कोहली, राहुल द्रविड आणि दिलीप सरदेसाई यांच्या पंक्तीत स्थान मिळविले. विंडीजविरुद्ध पदार्पण करणाऱ्या २२ वर्षांच्या डावखुऱ्या यशस्वीने शनिवारी सातव्या डावांत हा विक्रम केला. सध्याच्या मालिकेत त्याने दोनदा द्विशतकी खेळी केली.
गावसकर, कोहली आणि द्रविड यांनी कारकिर्दीत दोनदा एका मालिकेत ६०० वर धावा केल्या. सरदेसाई यांनी १९७०-७१ ला विंडीजमध्ये झालेल्या मालिकेत अशी कामगिरी केली होती. एका मालिकेत ७०० वर धावा ठोकणारे गावसकर हे एकमेव भारतीय खेळाडू आहेत. त्यांनी १९७८-७९ च्या विंडीज दौऱ्यात ४ शतके आणि एका अर्धशतकासह ६ कसोटींत ७३२ धावा केल्या. एका मालिकेत सर्वाधिक धावांचा विश्वविक्रम ऑस्ट्रेलियाचे महान सर डॉन ब्रॅडमन यांच्या नावावर आहे. त्यांनी १९३० ला इंग्लंडविरुद्ध ५ कसोटींत ४ शतकांसह ९७४ धावा केल्या होत्या.
इंग्लंडविरुद्ध एका कसोटी मालिकेत ६०० पेक्षा अधिक धावा करणारा यशस्वी जैस्वाल हा तिसरा भारतीय फलंदाज ठरला. यापूर्वी विराट कोहली (६५५) आणि राहुल द्रविड (६१९) यांनी हा पराक्रम केलेला आहे. रविचंद्रन अश्विन इंग्लंडविरुद्ध १०० कसोटी बळी पूर्ण करणारा पहिला भारतीय गोलंदाज ठरला. यापूर्वी अश्विनने आणि अनिल कुंबळे यांनी ऑस्ट्रेलियाविरुद्ध बळींचे शतक पूर्ण केलेले आहे.
४१ वर्षे २०९ दिवसांचा असलेला इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसन अजूनही त्याच ताकदीने गोलंदाजी करतो. रांचीच्या चौथ्या कसोटीतही त्याने धोकादायक रोहित शर्माला बाद करीत इंग्लंडच्या बळींचे खाते उघडले. जगभरात अँडरसनचा चाहतावर्गही मोठा आहे. प्रत्येक ठिकाणी त्याला पाठिंबा देणारे प्रेक्षक स्टेडियममध्ये पाहायला मिळतात. रांची कसोटीतही जेम्स अँडरसनला अनेक भारतीय चाहते पाठिंबा देत होते. अशातच अचानक एकाने घरून तयार करून आणलेला बोर्ड झळकावला. त्यावर लिहिले होते की, ‘अँडरसन जेव्हा निवृत्त होईल त्या दिवसापासून मी अभ्यासाला सुरुवात करेन.’ कॅमेरामनचे लक्ष वेधण्यात हा चाहता यशस्वी ठरला. समालोचकही यावर हसताना दिसले. सोशल मीडियावर एक चाहता गमतीने म्हणाला की, म्हणजे या मुलाला कधीच अभ्यास करायचा नाही आहे. कारण अँडरसन कधीच निवृत्त होऊ शकत नाही.
धावफलकइंग्लंड पहिला डाव : झॅक क्रॉली त्रि. आकाश दीप ४२, बेन डकेट झे. जुरेल गो. आकाश दीप ११, ओली पोप पायचीत गो. आकाश दीप ००, ज्यो रूट नाबाद १२२, जॉनी बेयरस्टो पायचीत गो. अश्विन ३८, बेन स्टोक्स पायचीत गो. जडेजा ३, बेन फोक्स झे. जडेजा गो. सिराज ४७, टॉम हार्टली त्रि. गो. सिराज १३, ओली रॉबिन्सन झे. जुरेल गो. जडेजा ५८, शोएब बशीर झे. पाटीदार गो. जडेजा ००, जेम्स ॲन्डरसन पायचीत गो. जडेजा ००. अवांतर: १९, एकूण : १०४.५ षटकांत सर्वबाद ३५३. बाद क्रम : १-४७, २-४७, ३-५७, ४-१०९, ५-११२, ६-२२५, ७-२४५, ८-३४७, ९-३४९, १०-३५३. गोलंदाजी : मोहम्मद सिराज १८-३-७८-२, आकाश दीप १९-०-८३-३, रवींद्र जडेजा ३२.५- ७-६७-४, रविचंद्रन अश्विन २२-१-८३-१, कुलदीप यादव १२-४-२२-०, यशस्वी जैस्वाल १-०-६-०.
भारत पहिला डाव : यशस्वी जैस्वाल त्रि. गो. बशीर ७३, रोहित शर्मा झे. फोक्स गो. ॲन्डरसन २, शुभमन गिल पायचीत गो. बशीर ३८, रजत पाटीदार पायचीत गो. बशीर १७, रवींद्र जडेजा झे. पोप गो. बशीर १२, सरफराज खान झे. रूट गो. हार्टले १४, ध्रुव जुरेल खेळत आहे ३०, रविचंद्रन अश्विन पायचीत गो. हार्टले १, कुलदीप यादव खेळत आहे १७, अवांतर : १५, एकूण : ७३ षटकांत ७ बाद २१९, बाद क्रम : १-४, २-८६,३-११२, ४-१३०, ५-१६१, ६-१७१, ७-१७७. गोलंदाजी : ॲन्डरसन १२-४-३६-१, राॅबिन्सन ९-०-३९-०, बशीर ३२-४-८४-४, हार्टले १९-५-४७-२, रूट १-०-१-०.