भारताचा स्टार खेळाडू ऋषभ पंत कार दुर्घटनेतून बालंबाल बचावला. त्याला काही ठिकाणी दुखापत झाली असली, तरी कारची एकूण अवस्था बघता, तो या मोठ्या अपघातातून सुदैवाने थोडक्यात बचावला, असे म्हणता येईल. अपेक्षा आहे की, पंत यातून लवकर सावरेल आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये झोकात पुनरागमन करेल. मात्र, मृत्यूला चकवा देणारा ऋषभ पंत हा काही पहिलाच क्रिकेटपटू नाही. या आधीही अनेक क्रिकेटपटू मोठ्या अपघातात सुदैवी ठरले आणि काही काळानंतर त्यांनी पुन्हा क्रिकेटचे मैदान गाजवायला सुरुवात केली. अशाच निवडक क्रिकेटपटूंचा घेतलेला हा आढावा....
मोहम्मद शमी (भारत)
१ चार वर्षापूर्वी म्हणजचे २०१८ ला भारताचा स्टार वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीच्या कारला अपघात झाला होता. त्यावेळी शमीच्या डोक्याला मार लागला होता, शिवाय डाव्या डोळ्यांच्या वर तीन ते चार टाकेही लागले होते. मात्र, यातून सावरत शमीने शानदार पुनरागमन केले. त्या वर्षात शमीने ४७ बळी घेतले आणि नंतर एकदिवसीय संघातही तो पुन्हा निवडला गेला.
मन्सूर अली खान पतौडी (भारत)
भारताच्या सर्वात यशस्वी कर्णधारामध्ये गणल्या जाणाऱ्या मन्सूर अली खान पतौडी यांनी २० वर्षांचे असताना आपला डावा डोळा गमावला. एका अपघातात त्यांच्या डोळ्यात काच घुसला होता. मात्र, उपचारावेळी त्यांनी हार मानली नाही आणि पुन्हा क्रिकेट खेळण्यास सुरुवात केली. तंत्रशुद्ध फलंदाजीसाठी त्यांना जगात ओळखले जायचे.
निकोलास पुरन (वेस्ट इंडीज)
आयपीएलच्या मिनी लिलावात वेस्ट इंडीजचा निकोलास पुरन ११६ कोटींचा भाव खाऊन गेला, मात्र, सात वर्षांपूर्वी हाच निकोलास स्वतःच्या पायावरही धड उभा राहू शकत नव्हता. २०१५ ला एका रस्ते अपघातात त्यांच्या दोन्ही पायांनी जबर इजा झाली होती. अनेक महिने तो व्हीलचेअरवरच होता. पण दुर्दम्य इच्छाशक्तीच्या बळावर तो संघात परतला.
ओशेन थॉमस (वेस्ट इंडिज)
एके काळी वेस्ट इंडिजचा प्रमुख वेगवान गोलंदाज असलेला ओरोन थॉमस २०२० साली एका मोठ्या कार अपघातातून बचावला. त्याच्या कारचा अक्षरश: चेंदामेंदा झाला होता, पण सुदैव म्हणजे त्याला तुलनेने फार कमी दुखापत झाली असल्याने, तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये लवकरच परतला.
अफसर झझाई (अफगाणिस्तान)
अफगाणिस्तानचा यष्टीरक्षक अफसर ब्रझाईही २०२० साली कार अपघातात गंभीर जखमी झाला होता. त्याच्या पुनरागमनाविषयीही प्रश्नचिन्ह होते. मात्र, विजीगिषू वृत्तीच्या मदतीने त्याने सर्व संकटांवर मात करत, अफगाणिस्तानच्या संघात पुन्हा स्थान मिळविले, शिवाय दोन कसोटी सामनेही तो खेळला.
Web Title: 5 cricketers who dodged death; Including Mohammed Shami, India's most successful captain in the list
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.