नवी दिल्ली : राष्ट्रीय डोपिंग विरोधी एजन्सीचे(नाडाचे) तीन अधिकारी आणि सहा डोप नियंत्रक असे नऊ जण १९ सप्टेंबरपासून सुरू होत असलेल्या आयपीएलच्या १३ व्या पर्वासाठी खेळाडूंचे डोप नमुने घेण्यास संयुक्त अरब अमिरात येथे जाणार आहेत. १० नोव्हेंबरपर्यंत चालणाऱ्या या स्पर्धेदरम्यान किमान ५० नमुने घेण्याचे लक्ष्य आखण्यात आले आहे.
बीसीसीआयच्या एका वरिष्ठ अधिकाºयाने वृत्तसंस्थेला दिलेल्या माहितीनुसार, नाडाचे नऊ अधिकारी यूएईत वास्तव्यास असतील. या काळात गरज भासल्यास यूएईच्या राष्टÑीय डोपिंग विरोधी संस्थेची मदत घेतली जाईल. तीन स्पर्धास्थळी नाडाची तीन अधिकाऱ्यांची टीम असेल. त्यात एक अधिकारी आणि दोन डोप नियंत्रकांचा समावेश असेल. याशिवाय स्थानिक डोपिंग विरोधी संस्थेचे कर्मचारी प्रत्येक स्थळी कार्यरत राहणार आहेत. या संपूर्ण यंत्रणेचा खर्च नाडा करणार की बीसीसीआय त्यात योगदान देणार, हे मात्र या अधिकाºयाने स्पष्ट केले नाही. भारतात नमुने गोळा करणे, वाहतूक आणि परीक्षण या सर्वांवर होणारा खर्च नाडाद्वारे केला जातो. यंदा स्पर्धा भारताबाहेर होत आहे. नाडाने किमान ५० खेळाडूंचे नमुने घेण्याचे ठरवले आहे. ही संख्या मर्यादित वाटत असली तरी बीसीसीआय काही खेळाडूंच्या रक्ताचे नमुने गोळा करू शकते. दुबई ते दोहा असा रक्त नमुन्याचा प्रवास सोपा आहे. नाडाचे जे अधिकारी यूएईला जाणार आहेत, त्या सर्वांना बीसीसीआयच्या जैव सुरक्षा वातावरणात (बायो बबल्स) राहण्यास सांगण्यात आले आहे. नाडाने बीसीसीआयला यूएईत पाच डोप नियंत्रण कक्ष स्थापन करण्याची सूचना केली आहे. यातील तीन कक्ष अबुधाबी, शारजा आणि दुबईत तसेच दोन कक्ष दुबई आणि अबुधाबीतील सराव केंद्रात राहतील.