IPL 2024, Royal Challengers Bengaluru vs Sunrisers Hyderabad Marathi Live : इंडियन प्रीमिअर लीग २०२४ च्या आजच्या सामन्यात चिन्नास्वामी स्टेडियमवर धावांची त्सुनामी आली. सनरायझर्स हैदराबादच्या २८७ धावांच्या प्रत्युत्तरात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने २६२ धावांपर्यंत मजल मारली. या सामन्यात एकूण ५४९ धावा चोपल्या गेल्या, ज्या ट्वेंटी-२० क्रिकेटमधील सर्वाधिक ठरल्या. ४३ चौकार व ३८ षटकार खेचले गेले. पण, आतापर्यंत १३ हजाराहून अधिक ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये एकाही संघाला जे जमले नव्हते ते RCB ने करून दाखवले.
ट्रॅव्हिस हेडच्या वादळी शतकाने RCB चे कंबरडे मोडले. त्याने ४१ चेंडूंत ९ चौकार व ८ षटकारांसह १०२ धावा चोपल्या. त्याने अभिषेक शर्मा ( ३४) व हेनरिच क्लासेन यांच्यासोबत मॅच विनिंग भागादीरीही केली. क्लासेनने ३१ चेंडूंत २ चौकार व ७ षटकारांसह ६७ धावा कुटल्या. एडन मार्कराम ( ३२*) व अब्दुल समद ( ३७*) यांनी १९ चेंडूंत ५६ धावा जोडल्या व संघाला ३ बाद २८७ धावांपर्यंत पोहोचवले. प्रत्युत्तरात विराट कोहली व फॅफ ड्यू प्लेसिस यांनी चांगली सुरूवात करून दिली होती, परंतु मयांक मार्कंडेने विराटची विकेट घेत SRH ला यश मिळवून दिले. त्यानंतर पुढील ४२ धावांत RCB चे ५ फलंदाज माघारी परतले.
पण, दिनेश कार्तिक मैदानावर उभा राहिला आणि त्याने ३४ चेंडूंत ५ चौकार व ७ षटकारांसह ८३ धावांची वादळी खेळी केली. RCB ने ७ बाद २६२ धावांपर्यंत मजल मारली. या सामन्यात ५४९ धावा झाल्या आणि ट्वेंटी-२०तील या सर्वोत्तम ठरल्या. मुंबई इंडियन्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद यांच्यातल्या याच आयपीएलमध्ये ५२३ धावा झाल्या होत्या.
ट्वेंटी-२० क्रिकेटच्या इतिहासात १३ हजाराहून अधिक सामन्यांत लक्ष्याचा पाठलाग करताना ही सर्वोत्तम धावसंख्या ठरली. आज बंगळुरूने २६२ धावा उभ्या करून इतिहास रचला. आजच्या सामन्यात मिळून ८१ चौकार-षटकार लागले, ट्वेंटी-२० क्रिकेटमधील सर्वाधिक आहेत. दक्षिण आफ्रिका विरुद्ध वेस्ट इंडिंज यांच्यात २०२३ साली झालेल्या लढतीत इतके चौकार-षटकार लागले होते.
T20 सामन्यात दोन्ही डावात 250+ धावा करणारे संघ
सनरायझर्स हैदराबाद - 287/3 वि. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू - 262/7 - 15 एप्रिल 2024मिडलसेक्स - 254/3 वि. सरे - 252/7 - 22 जून 2023दक्षिण आफ्रिका - 259/4 वि वेस्ट इंडिज - 258/5 - 26 मार्च 2023