कराची : चॅम्पियन्स ट्रॉफीच्या आयोजनावरून सुरू असलेला तिढा कायम राहिल्यास फेब्रुवारी-मार्च २०२५ ला आयोजित या स्पर्धेतून यजमान पाकिस्तानने माघार घेतल्यास आयसीसीचे केवळ ६३५ कोटींचे नुकसान होईल, शिवाय पाकला शिक्षेस सामोरे जावे लागेल. यामुळे पाकिस्तान क्रिकेटला आंतरराष्ट्रीय स्तरावर वेगळे पाडले जाण्याचा धोका असेल. त्याचवेळी, भारताने या स्पर्धेतून माघार घेतल्यास आयसीसीला तब्बल ५,७२० कोटी रुपयांचे नुकसान सहन करावे लागेल.
आयसीसीच्या ५० षटकांच्या या स्पर्धा आयोजनाशी जुळलेल्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, ‘आयसीसी आणि बीसीसीआयने हायब्रिड मॉडेल पूर्णपणे स्वीकारण्यास नकार दिला, तर पीसीबीसाठी माघारीचा निर्णय सोपा राहणार नाही. पाकने आयसीसीसोबत यजमानपदाच्या करारावर स्वाक्षरी केली, शिवाय अनिवार्यपणे सहभागाविषयीच्या करारावरदेखील सही केली आहे. हस्ताक्षर केल्यानंतरच सहभागी देशांना कमाईचा वाटा दिला जातो. आयसीसीने प्रसारकांसोबत जो करार केला त्यात सर्व सहभागी देश सहभागी होण्याची हमी दिली आहे.’
चॅम्पियन्स ट्रॉफीचे आयोजन हायब्रिड मॉडेलनुसार करण्याबाबत सहमती कायम करण्यात आयसीसी यशस्वी ठरले. त्यानुसार भारत आपले सर्व सामने दुबईत खेळेल. याशिवाय आयसीसीच्या २०२७ पर्यंत होणाऱ्या सर्वच स्पर्धांमध्ये अशीच व्यवस्था कायम असेल. याची औपचारिक घोषणा अद्याप झालेली नाही. हा करार अस्तित्वात आल्यास पाकिस्तान २०२७ पर्यंत होणाऱ्या आयसीसी स्पर्धेदरम्यान भारताचा दौरा करण्यास बांधिल राहणार नाही.
स्पर्धेवर बहिष्कार टाका : रशिद लतिफ
पाकचा माजी कर्णधार रशिद लतिफ याने पीसीबीला सूचना केली की, बीसीसीआयने ठोस निर्णय घेण्याआधी पाकने स्पर्धेवर बहिष्कार टाकायला हवा. तो म्हणाला, ‘अफगाण युद्ध असो किंवा क्रिकेट, आम्हाला नेहमीच बळीचा बकरा बनवले गेले.
पीसीबी, एसीबी आणि आयसीसी हे बीसीसीआय विरुद्ध भांडू शकत नाहीत. त्यांना पाकिस्तानला कमी लेखण्याची संधीच मिळाली आहे.
आम्ही मिळून त्यांच्याविरोधात लढू; पण एकच भीती वाटते आणि ती म्हणजे जर भारताने स्पर्धेतून माघार घेतली, तर काय?’
पाकने चॅम्पियन्स ट्रॉफीतून माघार घेतल्यास आयसीसी बोर्डातील सर्व १६ देश पीसीबीवर खटला दाखल करतील. पाक बाहेर पडल्यास हितधारकांना नुकसान होईल.
Web Title: 5,720 crore loss if India withdraws from icc championship tournament; but 635 crores hit only if taken by Pakistan
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.