भारताचा दिग्गज फिरकीपटू आर अश्विन ( R Ashwin) यानं काही दिवसांपूर्वी इंडियन प्रीमिअर लीगमधून ( IPL 2021) माघार घेण्याचा निर्णय घेतला. आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्स संघाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या अश्विनच्या कुटुंबीयांचा कोरोनासोबत लढा सुरू आहे आणि त्यांच्यासाठी अश्विननं आयपीएलमधून माघार घेतली. अश्विनची पत्नी प्रिथी हिनं शुक्रवारीत कुटुंबाच्या कोरोना लढ्याबाबत अपडेट्स दिले. कुटुंबातील सहा प्रौढ व ६ मुलांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याची माहिती प्रिथीनं दिली. यामध्ये अश्विन व प्रिथी यांच्या आई-वडिलांसह दोन मुलींचा समावेश आहे.
प्रिथीनं ट्विट केलं की,''तुम्हाला हाय बोलण्याइतकं मला बरं वाटत आहे. या एकाच आठवड्यात कुटुंबातील ६ प्रौढ व ४ मुलांना कोरोनाची लागण झाली आहे. आमची मुलं या संसर्गाचे वाहक ठरले. सगळे वेगवेगळ्या घरी व हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहोत. हा आठवडा काळरात्रीसारखा आहे. ३ पालकांपैकी १ पालक घरी आहे.''
''कोरोना लस घ्या. तुम्हीही घ्या आणि कुटुंबीयांना घेऊ द्या... कोरोनाविरुद्धची लढाई जिंकण्याचा हा सर्वोत्तम मार्ग आहे. या आजारानंतर येणारी शारिरीक अशक्तपणा आपण भरून काढू, परंतु मानसिक आरोग्यासाठी वेळ लागेल. ५ ते ८ वा दिवस हा माझ्यासाठी अत्यंत खराब होता. सर्व जण तिथं होती, मदत करत होती, तरीही सोबत कुणीच नव्हतं. आयसोलेशनमध्ये होती,''असंही तिनं लिहिलं.
'माझे कुटुंब कोरोनाच्या संकटात, आयपीएल सोडतोय'"उद्यापासून मी यंदाच्या आयपीएल स्पर्धेतून ब्रेक घेत आहे. माझं कुटुंब आणि नातेवाईक कोरोनाशी लढा देत आहेत. अशा कठीण प्रसंगात मी त्यांच्यासोबत असणं जास्त महत्वाचं आहे. सर्व ठीक झाल्यास मी पुन्हा खेळण्यासाठी प्रयत्नशील असेन. धन्यवाद दिल्ली कॅपिटल्स", असं ट्विट अश्विननं २६ एप्रिलला केलं होतं.