‘7 Captains In 6 Months’ - भारतीय क्रिकेट संघात सध्या कर्णधारांची संगीत खुर्ची सुरू असल्याचे दिसतेय... विराट कोहलीने कर्णधारपद सोडल्यानंतर मागील ६ महिन्यांत टीम इंडियाने ७ कर्णधार बदलले. खरं तर विराटच्या राजीनाम्यानंतर रोहित शर्माकडे ( Rohit Sharma) भारताच्या तीनही फॉरमॅटच्या संघाचे नेतृत्व सोपवण्यात आले. पण, दुखापत किंवा विश्रांती या कारणास्तव रोहितला अनेक मालिकांना मुकावे लागले.
२०२२ मध्ये भारतीय सघाचे कर्णधार ( Indian captains in 2022)
- दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कसोटी मालिका - विराट कोहली
- दक्षिण आफ्रिकेविरुद्ध वन डे मालिका - लोकेश राहुल
- श्रीलंका व वेस्ट इंडिज यांच्याविरुद्धची मालिका - रोहित शर्मा
- दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ट्वेंटी-२० मालिका - रिषभ पंत
- आयर्लंडविरुद्ध ट्वेंटी-२० मालिका - हार्दिक पांड्या
- इंग्लंडविरुद्ध पाचवी कसोटी - जसप्रीत बुमराह
- दोन ट्वेंटी-२० सराव सामने - दिनेश कार्तिक
- इंग्लंडविरुद्धची वन डे व ट्वेंटी-२० मालिका - रोहित शर्मा
- वेस्ट इंडिजविरुद्धची वन डे मालिका - शिखर धवन
कर्णधारांच्या या संगीत खुर्चीवरून नेटिझन्स BCCIला झोडत आहेत. पण, बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली ( Sourav Ganguly) यांनी याबाबत मोठं विधान केलं आहे. PTI सोबत बोलताना गांगुली म्हणाला की,''एवढ्या कमी कालावधीत सात वेगवेगळे कर्णधार असणे, हे आदर्श नाही, हे मी पूर्णतः मान्य करतो. पण ते एका अपरिहार्य परिस्थितीमुळे घडले आहे. दक्षिण आफ्रिकेत मर्यादित षटकांच्या मालिकेत नेतृत्व करण्यासाठी रोहित शर्मा पूर्णपणे सज्ज होता. पण, त्याला दुखापत झाली. लोकेश राहुलने वन डे संघाचे नेतृत्व सांभाळले. त्यानंतर घरच्या मैदानावर आफ्रिकेविरुद्ध लोकेश राहुल कर्णधारपद भूषविणार होता, परंतु एक दिवसआधी तो जखमी झाला.''
''इंग्लंडमध्ये रोहित सराव सामना खेळला, तेव्हा त्याला कोरोनाची लागण झाली. या अशा परिस्थितीत कोणाचीच चूक नव्हती. वेळापत्रक एवढं व्यग्र आहे की काही खेळाडूंना विश्रांती देणेही गरजेचे आहे. त्यात दुखापती आल्या आणि त्यामुळ कामाचा ताण कमी करण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मालिकेत तुम्हाला राहुल द्रविडची दया येते, परंतु अपरिहार्य परिस्थितीमुळे नवा कर्णधार निवडावा लागतो,''असे गांगुलीने मान्य केले.