पाकिस्तानचा संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे आणि तिथेही त्यांनी गचाळ फिल्डींगमुळे स्वतःचं हसू करून घेतलं आहे... पाकिस्तान एकादश आणि अध्यक्षीय एकादश यांच्यातल्या सराव सामन्यात पाकिस्तानच्या क्षेत्ररक्षणामुळे ऑस्ट्रेलियन फलंदाजाने १ चेंडूंत ७ धावा केल्या आणि अर्धशतक पूर्ण केले. नवीन कर्णधार शान मसूदच्या २०१ धावांच्या जोरावर पाकिस्तानने पहिला डाव ९ बाद ३९१ धावांवर घोषित केला. त्यानंतर अध्यक्षीय एकादशकडून दमदार प्रत्युत्तर मिळाले आहे. त्यांनी १२० षटकांत ४ बाद ३२४ धावा उभ्या केल्या आहेत. पण, या सामन्याचा तिसरा दिवस चर्चेत राहिला तो पाकिस्तानच्या क्षेत्ररक्षणामुळे.
प्रथम फलंदाजी करताना बाबर आजम बॅटींग टीममध्ये आहे हेच विसरलेला पाहायला मिळाला होता. शान मसूद आणि तो मैदानावर पाकिस्तानसाठी चांगले खेळत होते. मसूदने मारलेला चेंडू नॉन स्ट्राईकवर उभा असलेला बाबर अडवण्याचा प्रयत्न करताना दिसला. पाकिस्तानकडून अब्दुला शफिक ( ३८), बाबर ( ४०), सर्फराज अहमद ( ४१) यांनी चांगला खेळ केला. मसूदने २९८ चेंडूंत १४ चौकार व १ षटकारासह नाबाद २०१ धावांची खेळी केली. अध्यक्षीय एकादशकडून कॅमेरून बॅनक्रॉफ्ट ( ५३), मार्नस लाबुशेन ( ४९) यांनी दमदार सुरुवात करून दिली.
कॅमेरून ग्रीन ( ४६) व कर्णधार नॅथन मॅकस्वीनी ( ४०) यांनीही उल्लेखनीय खेळी करताना मॅट रेनशॉला साथ दिली. रेनशॉ ११७ धावांवर खेळतोय.