Yusuf Pathan, IL T20: आंतरराष्ट्रीय टी२० लीगमध्ये, दुबई कॅपिटल्सने उत्तम रँकिंग असलेल्या MI Emirates चा पराभव केला. रविवारी झालेल्या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना एमआय एमिरेट्स संघाने २० षटकात १६४ धावा केल्या आणि प्रत्युत्तरात दुबई कॅपिटल्स संघाने हे लक्ष्य ११ चेंडू राखून केवळ ३ गडी गमावून पूर्ण केले. 'दुबई कॅपिटल्स'च्या (Dubai Capitals) दोन फलंदाजांनी एमआय एमिरेट्सला झोडपले. दासून शनाका आणि सिकंदर रझा यांनी झटपट अर्धशतके ठोकून दुबई कॅपिटल्सला विजय मिळवून दिला. दुबईच्या या दोन फलंदाजांनी शतकी भागीदारी करून संघाला विजय मिळवून दिला.
लक्ष्याचा पाठलाग करताना दुबईच्या ३ विकेट्स ४४ धावांवर पडल्या होत्या आणि एमआय एमिरेट्सला विजय मिळण्याची आशा होती. पण त्यानंतर शनाका आणि रझा यांनी आश्चर्यकारक कामगिरी केली. दोघांनीही वेगवान फलंदाजी करताना ७ षटकार आणि ९ चौकार लगावले. दोघांमध्ये ७० चेंडूत नाबाद १२२ धावांची भागीदारी झाली.
युसूफ पठाणचा 'मास्टरस्ट्रोक'!
युसूफ पठाणला या सामन्यातून दुबई कॅपिटल्सचे नेतृत्व करण्याची जबाबदारी मिळाली होती. त्याने अप्रतिम प्लॅन केला आणि मुंबई संघाला चकित केले. युसूफने सहाव्या क्रमांकावर फलंदाजी करणाऱ्या शनाकाला तिसऱ्या क्रमांकावर पाठवले आणि याच खेळाडूने आपल्या संघाला दमदार कामगिरी करून विजय मिळवून दिला. रोव्हमन पॉवेल शून्यावर बाद झाल्यानंतर शनाकाने नाबाद अर्धशतक ठोकले आणि सिकंदर रझासोबत उत्कृष्ट शतकी भागीदारी केली. तत्पूर्वी, जेक बॉलने गोलंदाजीत ३ तर झम्पाने २ बळी घेतले. रझानेही ४ षटकात २९ धावा देऊन एक बळी घेत गोलंदाजीतील चमक दाखवून दिली. शनाकाला 'प्लेअर ऑफ द मॅच'चा पुरस्कार मिळाला.
IL T20 चे गुण
आंतरराष्ट्रीय टी२० लीगच्या पॉइंट टेबलबद्दल बोलायचे तर गल्फ जायंट्स पहिल्या क्रमांकावर आहेत. त्यांनी ९ पैकी ६ सामने जिंकले. डेझर्ट वायपर्सने १० पैकी ७ सामने जिंकले. मुंबईचा संघ हा सामना हरला, पण १० पैकी ५ सामने जिंकून तिसऱ्या स्थानावर आहेत. दुबईचा संघ या विजयासह चौथ्या स्थानावर आला असून त्यांचे ८ गुण झाले आहेत.