नवी दिल्ली : पुढील वर्षी होणारा वनडे विश्वचषक (World Cup 2023) भारतात होणार आहे. यात एकूण 10 संघ सहभागी होणार आहेत. 7 संघांना विश्वचषक सुपर लीग (2020–2023 ICC Cricket World Cup Super League) मधील कामगिरीच्या आधारे विश्वचषकाची तिकिटे मिळणार आहेत. ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये या स्पर्धेचे सामने भारतात होणार आहेत. यजमान भारतीय संघाने आधीच पात्रता फेरी गाठली आहे. भारतासह 7 संघांनी विश्वचषकात आपले स्थान पक्के केले आहे. मात्र दक्षिण आफ्रिकेचा संघ अद्यापही थेट क्वालिफाय करू शकलेला नाही. याशिवाय पुढील वर्षी होणाऱ्या क्वालिफायरमधून अंतिम-2 संघ निश्चित केले जातील. पण सगळ्यांच्या नजरा भारत आणि पाकिस्तान (IND vs PAK) वर असतील, त्यांना एकाच गटात ठेवले जाईल की नाही. कारण मागील दोन ट्वेंटी-20 विश्वचषकात दोन्ही संघांना एकाच गटात ठेवण्यात आले होते.
वर्ल्ड कप सुपर लीगबद्दल भाष्य करायचे झाले तर, प्रत्येक संघाला प्रत्येकी 24-24 सामने खेळायचे आहेत. आताच्या घडीला क्रमवारीत भारतीय संघ पहिल्या स्थानावर आहे. भारताने आतापर्यंत 20 सामने खेळले आहेत, तर त्यामधील 13 जिंकले तर 6 सामन्यांमध्ये पराभव झाला आहे. संघाचे एकूण 134 गुण आहेत. त्याचबरोबर इंग्लंडचे 18 सामन्यांत 125 गुण झाले असून ते दुसऱ्या क्रमांकावर आहे. न्यूझीलंडचेही 17 सामन्यांत 125 गुण आहेत, मात्र नेट रनरेटमुळे ते सध्या तिसऱ्या क्रमांकावर आहेत.
पाकिस्तानही झाला क्वालिफाय विश्वचषकासाठी आतापर्यंत भारत, इंग्लंड, न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया, बांगलादेश, पाकिस्तान आणि अफगाणिस्तान या संघानी क्वालिफाय केले आहे. ऑस्ट्रेलिया 120 गुणांसह पाचव्या क्रमांकावर, पाकिस्तान 120 गुणांसह सहाव्या स्थानावर आणि अफगाणिस्तान 115 गुणांसह सातव्या स्थानावर स्थित आहे. वेस्ट इंडिजने त्यांचे सर्व 24 सामने खेळले असून 88 गुणांसह ते आठव्या स्थानावर आहेत. मात्र विडिंजचा संघ अद्याप क्वालिफाय झालेला नाही.
श्रीलंका आणि आफ्रिकेमध्ये रस्सीखेचविश्वचषक सुपर लीगमध्ये श्रीलंकेचा संघ सध्या दहाव्या स्थानावर आहे. त्यांचा रविवारी अफगाणिस्तानविरुद्धचा सामना पावसामुळे रद्द झाला. यामुळे त्यांच्या थेट पात्रतेच्या आशेला धक्का बसला आहे. त्यांचे 20 सामन्यांत 67 गुण आहेत. त्याचबरोबर दक्षिण आफ्रिकेचे 16 सामन्यांत 59 गुण आहेत. आफ्रिकेच्या संघाने आतापर्यंत केवळ 5 सामने जिंकले आहेत, तर 9 सामन्यात पराभव पत्करावा लागला आहे. खरं त्यांना ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडसारख्या मोठ्या संघांशी स्पर्धा करावी लागणार आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"