भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील सामना भारतीय संघासाठी खास असणार आहे. कारण याच दिवशी अर्थात ५ नोव्हेंबरला संघाचा माजी कर्णधार आणि आघाडीचा फलंदाज विराट कोहलीचा ३५वा वाढदिवस आहे. हा सामना कोलकात्यातील ईडन गार्डन्स मैदानावर होणार असून किंग कोहलीच्या बर्थडेसाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे. विराट कोहलीचा वाढदिवस संस्मरणीय बनवण्यासाठी बंगाल क्रिकेट असोसिएशनने विशेष तयारी केली आहे. खरं तर या दिवशी स्टेडियममध्ये अंदाजे ७० हजार चाहते विराट कोहलीच्या मास्कमध्ये दिसतील. याशिवाय स्पेशल केक कापला जाणार आहे.
तसेच विराट कोहलीच्या वाढदिवसानिमित्त ईडन गार्डन्समध्ये लेझर शोचे आयोजन करण्यात येणार आहे. रिपोर्ट्सनुसार, फटाक्यांच्या आतषबाजीत किंग कोहलीला शुभेच्छा दिल्या जातील. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील सामना भारतीय वेळेनुसार दुपारी २ वाजता सुरू होईल. रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेला हरवून विराट कोहलीला विजयाची भेट देण्यासाठी प्रयत्नशील असेल. सध्या भारतीय संघ गुणतालिकेत अव्वल स्थानावर आहे. भारतीय संघाने आतापर्यंत सर्व सहा सामने जिंकले असून १२ गुणांसह संघाने उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे.
किंग कोहलीचा 'विराट' फॉर्म रविवारी लखनौमध्ये भारत आणि इंग्लंडचा संघ आमनेसामने होता. या सामन्यात विराट कोहली एकही धाव न काढता पॅव्हेलियनमध्ये परतला. मात्र, या स्पर्धेत विराट कोहलीने चमकदार कामगिरी केली. सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत विराट कोहली सहाव्या क्रमांकावर आहे. विराटने आतापर्यंत सहा सामन्यांत ८८.५० च्या सरासरीने ३५४ धावा केल्या आहेत. त्यामुळे किंग कोहली त्याच्या वाढदिवशी मोठी खेळी करून चाहत्यांना भेट देणार का हे पाहण्याजोगे असेल.