भारताच्या पृथ्वी शॉ आणि इशान किशन यांनी रविवारी श्रीलंकेच्या गोलंदाजांना धु धु धुतले... दुसरीकडे इंग्लंडच्या फलंदाजांनी पाकिस्तानी गोलंदाजांची धुलाई केली.. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये युवा फलंदाज चौकार-षटकारांच आतषबाजी करत असताना इंग्लंडच्या क्लब क्रिकेटमध्ये ७२ वर्षांच्या फलंदाजानं कमाल केली. त्यांनी ना केवळ नाबाद शतकी खेळी केली, तर संघाला १११ धावांनी विजय मिळवून दिला. ईस्टकॉम्ब क्रिकेट क्लब आणि फ्रेम्पटन ऑन सेव्हर्न क्रिकेट क्लब यांच्यात हा सामना खेळला गेला. ईस्टकॉम्ब क्लबच्या फिल बॅरी ( Phil Barry) यांनी नाबाद १०९ धावा केल्या. संघासाठी ते सलामीला आले अन् अखेरपर्यंत नाबाद राहत विजय निश्चित केला. ईस्टकॉम्बनं ४० षटकांच्या या सामन्यात ४ बाद २६५ धावा केल्या, प्रत्युत्तरात फ्रेंम्पटन संघाला ४० षटकांत ८ बाद १५४ धावा करता आल्या.
प्रथम फलंदाजी करतान फिल बॅरी आणि रिच पॉविस यांनी दमदार सुरुवात करून दिली. बॅरीनं शतक झळकावले, तर पॉविसनं ५७ धावांची खेळी केली. पॉविसला ओरला राईटनं बाद केलं. त्यानंतर नील हॉलब्रो ( ४) व पीट स्मॉल ( ५) हे स्वस्तात बाद झाले. पण, फिलनं एक बाजू लावून धरताना संघाला मोठी धावसंख्या उभारून दिली. लक्ष्याचा पाठलाग करताना फ्रेम्पटनच्या पाच फलंदाजांना खातंही उघडता आले नाही. त्यांच्या १५४ धावांमध्ये ६९ अतिरिक्त धावा होत्या.