आयसीसी क्रिकेट विश्वचषक स्पर्धा यावर्षी ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात भारतामध्ये आयोजित होणार आहे. या स्पर्धेत एकूण १० संघ खेळणार आहेत. दरम्यान, या दहा संघांपैकी ८ संघांची नावं निश्चित झाली आहेत. तर उर्वरित दोन जागांसाठी वेस्ट इंडिज आणि श्रीलंका या दोन माजी विश्वविजेत्यांसह दहा संघ पात्रता स्पर्धेत खेळणार आहेत. दरम्यान, काल बांगलादेशविरुद्ध झालेला एकदिवसीय सामना पावसामुळे रद्द झाल्याने वर्ल्डकपसाठी थेट पात्र ठरण्याचे आयर्लंडच्या संघाचे स्वप्न भंगले आहे.
बांगलादेश आणि आयर्लंड यांच्यातील एकदिवसीय सामना चेम्सफोर्ड येथे खेळला गेला. मात्र हा सामना पावसामुळे पूर्ण होऊ शकला नाही. या सामन्यात बांगलादेशने प्रथम फलंदाजी करताना ५० षटकांत ९ बाद २४६ धाला काढल्या होत्या. त्यानंतर आयर्लंडने १६.३ षटकांत ३ बाद ६५ धावांपर्यंत मजल मारली असताना सामन्यात पावसाचा व्यत्यय आला, त्यानंतर सामना रद्द झाला. त्यामुळे आयर्लंडच्या संघाला मोठा धक्का बसला आहे.
दरम्यान, या सामन्यानंतर क्रिकेट वर्ल्डकपसाठी थेट पात्र ठरणाऱ्या संघांची नावंही निश्चित झाली आहेत. त्यामध्ये भारत (यजमान), न्यूझीलंड, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, बांगलादेश, पाकिस्तान, अफगाणिस्तान, दक्षिण आफ्रिका या संघांचा समावेश आहे.
दक्षिण आफ्रिकेचा संघ अखेरच्या क्षणी वर्ल्डकपसाठी पात्र ठरला आहे. दक्षिण आफ्रिकेने वेस्ट इंडिजला मागे टाकत वर्ल्डकपचं तिकीट पक्कं केलं. दक्षिण आफ्रिकेनं घरच्या मैदानावर नेदरलँड्सला पराभूत केलं होतं. दुसरीकडे श्रीलंकेच्या संघाला न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेत विजय मिळवण्यात अपयश आलं होतं. त्यामुळए आता विश्वचषकात खेळण्यासाठी श्रीलंकेलाही पात्रता फेरीच्या अग्निदिव्यातून जावं लागणार आहे.
वर्ल्डकप २०२३ साठी पात्रता फेरीचे सामने १८ जून ते ९ जुलै या काळात खेळवण्यात येणार आहेत. या पात्रता फेरीमध्ये वेस्ट इंडिज आणि श्रीलंका या माजी विश्वविजेत्यांसह झिम्बाब्वे, नेदरलँड्स, स्कॉटलंड, ओमान, नेपाळ, अमेरिका, संयुक्त अरब अमिराती आणि आयर्लंड हे संघ खेळणार आहेत.