Join us  

विश्वचषकासाठी ८ ते १० चेहरे निश्चित - रोहित शर्मा

या मालिकेद्वारे विराट आणि रोहित १४ महिन्यांनंतर संघात परतले. शिवम दुबेच्या दमदार कामगिरीच्या बळावर भारताने ही मालिका ३-० ने जिंकली.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 19, 2024 12:31 PM

Open in App

बंगळुरू : जूनमध्ये आयोजित टी-२० विश्वचषकासाठी भारतीय संघाची बांधणी झालेली नाही. मात्र, आठ-दहा जणांची आतापासूनच निवड निश्चित असल्याचे सूचक वक्तव्य कर्णधार रोहित शर्मा याने गुरुवारी केले. जे नियमित चेहरे संघाचा भाग असतील, त्यांच्याबाबत माहिती असल्याचे रोहित म्हणाला. विश्वचषकाआधी भारताने काल अफगाणिस्तानविरुद्ध अखेरची टी-२० मालिका खेळली. या मालिकेद्वारे विराट आणि रोहित १४ महिन्यांनंतर संघात परतले. शिवम दुबेच्या दमदार कामगिरीच्या बळावर भारताने ही मालिका ३-० ने जिंकली.   

‘काही प्रतिभावान खेळाडू विश्वचषकाच्या संघात स्थान मिळवू शकणार नाहीत; पण व्यावसायिक खेळात असे होतच असते. सर्वांना एकाच वेळी खूश करू शकत नाही. आम्ही वनडे विश्वचषकाआधी टी-२० मालिकेत अनेक चेहऱ्यांना संधी  दिली; पण संघाची घोषणा झाली त्यावेळी अनेक जण बाहेर झाले. ते निराश झाले असावेत; पण आमच्या दृष्टीने प्रत्येक गोष्ट स्पष्ट होणे गरजेचे आहे,’ असे रोहितने सांगितले. ‘२५-३० खेळाडूंच्या पूलमध्ये सर्वांकडून काय अपेक्षा आहेत, याची सर्वांना जाणीव आहेच.

आम्ही टी-२० विश्वचषकासाठी संघ निश्चित केला नसला तरी यातील ८-१० खेळाडूंचे स्थान निश्चित असेल. अनेक सामने विंडीजमधील मंद खेळपट्ट्यांवर होतील.  त्यानुसार संघाची बांधणी केली जाईल.  प्रशिक्षक द्रविड आणि मी सर्व खेळाडूंमध्ये स्पष्टपणा राखतो. कर्णधार या नात्याने मी सर्वांना खूश करू शकत नाही. संघाच्या गरजेनुसार फोकस करावा लागतो,’ असे कर्णधार म्हणाला. सुरुवातीच्या दोन सामन्यांत भोपळा  फोडू न शकलेल्या रोहितने तिसऱ्या सामन्यात टी-२० त विक्रमी पाचवे शतक ठोकले. याविषयी विचारताच तो म्हणाला, ‘गोलंदाजांवर दडपण आणण्यासाठी काही फटके खेळावे लागतात. मी ‘रिव्हर्स स्वीप’ला प्राधान्य दिले.’

टी-२० विश्वचषकाआधी अनेक पर्याय : द्रविडअफगाणिस्तानविरुद्धच्या टी-२० मालिका विजयाचा आनंद आहे. कारण, यामध्ये युवा खेळाडूंनी आपली क्षमता दाखवून दिली. यामुळे आगामी टी-२० विश्वचषक स्पर्धेसाठी संघाकडे अनेक पर्याय उपलब्ध झाले असून, ही खूप चांगली बाब आहे, अशी प्रतिक्रिया भारताचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी व्यक्त केली.भारताने गेल्या वर्षी झालेल्या एकदिवसीय सामन्यांच्या विश्वचषक स्पर्धेनंतर ११ टी-२० सामने खेळले आहेत. यामध्ये काही वरिष्ठ खेळाडूंना विश्रांती दिल्यानंतर भारताने जितेश शर्मा, शिवम दुबे यांसारख्या युवा खेळाडूंना संधी दिली. द्रविड यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले की, एकदिवसीय सामन्यांच्या विश्वचषक स्पर्धेनंतर विविध खेळाडूंनी खेळ दाखवला. यासाठी अनेक कारणे आहेत. पण, टी-२० विश्वचषकाआधी आमच्याकडे आता अनेक पर्याय आहेत. ही खूप चांगली बाब आहे. तरी आम्हाला अद्याप काही गोष्टी सुधारण्यावर भर द्यावा लागेल. भारतीय संघ टी-२० विश्वचषक स्पर्धेआधी अखेरचा टी-२० सामना खेळला. याबाबत, एक संघ म्हणून आता आम्हाला विश्वचषक स्पर्धेआधी सामना खेळायचा नसल्याने आयपीएल आणि त्यामध्ये खेळाडूंची होणारी कामगिरी यावर आमचे लक्ष राहील. अष्टपैलू शिवम दुबे मालिकावीर ठरला. त्याच्याविषयी द्रविड म्हणाले की, तो मोठ्या कालावधीनंतर परतला आहे आणि खूप चांगला खेळाडू बनून आला आहे. त्याच्याकडे आधीपासूनच गुणवत्ता होती आणि त्याच्यासाठी मी खूश आहे.यष्टिरक्षणाबाबत द्रविड यांनी सांगितले की, यष्टिरक्षणासाठी आमच्याकडे खूप पर्याय आहेत. संजू, किशन, जितेश आणि ऋषभ हे सर्व जण आहेत. पण, आता पुढील महिन्यांमध्ये काय घडामोडी घडतात ते पाहावे लागेल. यानुसारच निर्णय घेण्यात येईल.

टॅग्स :रोहित शर्मा