IPL 2024 मध्ये सनरायझर्स हैदराबादच्या ( SRH ) ३ बाद २८७ धावांचा पाठलाग करताना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू ( RCB )ने ७ बाद २६२ मजल मारली. दिनेश कार्तिकने ( Dinesh Karthik) शेवटपर्यंत फटकेबाजी करून RCB च्या विजयासाठी प्रयत्न केले होते. पण, त्याला इतर सहकाऱ्यांची साथ मिळाली नाही. कार्तिक मैदानावर उभा असेपर्यंत SRH चं टेंशन कायम होतं. कार्तिकने उत्तुंग फटकेबाजी करून आयपीएल २०२४ मधील सर्वात दूरचा षटकार खेचला.
काल ट्रॅव्हिस हेडने ४१ चेंडूंत ९ चौकार व ८ षटकारांसह १०२ धावा चोपल्या. त्याने अभिषेक शर्मा ( ३४) व हेनरिच क्लासेन ( ६७) यांच्यासोबत मॅच विनिंग भागादीरीही केली. एडन मार्कराम ( ३२*) व अब्दुल समद ( ३७*) यांनी १९ चेंडूंत ५६ धावा जोडल्या व संघाला ३ बाद २८७ धावांपर्यंत पोहोचवले. प्रत्युत्तरात विराट कोहली ( ४२) व फॅफ ड्यू प्लेसिस ( ६२) यांनी चांगली सुरूवात करून दिली होती, परंतु पुढील ४२ धावांत RCB चे ५ फलंदाज माघारी परतले.दिनेश कार्तिक मैदानावर उभा राहिला आणि त्याने ३४ चेंडूंत ५ चौकार व ७ षटकारांसह ८३ धावांची वादळी खेळी केली. RCB ने ७ बाद २६२ धावांपर्यंत मजल मारली.
दिनेश कार्तिकने या सामन्यात १०८ मीटर लांब षटकार मारला, जो आयपीएल २०२४ च्या हंगामातील सर्वात लांब षटकार ठरला. टी नटराजनने टाकलेल्या १६व्या षटकातील पहिल्या चेंडूवर कार्तिकने लेग साइडकडे चेंडू पाठवला. चेंडू स्टेडियमच्या छतापर्यंत पोहोचला. याच सामन्यात, SRH च्या हेनरिच क्लासेनने पहिल्या डावात १०६ मीटरचा षटकार मारला होता.