India vs Pakistan , ACC Women’s Asia Cup 2022 Schedule - मागच्या वर्षी ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत भारताला कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानकडून पराभव पत्करावा लागला होता. या पराभवाचा वचपा कधी एकदा टीम इंडिया काढते, असे भारतीय चाहत्यांना वाटत होते. तब्बल १० महिन्यानंतर India vs Pakistan सामना झाला अन् आशिया चषक २०२२ या सामन्यात रोहित शर्मा अँड कंपनीने विजय मिळवला. पण, आठवडाभरात सुपर ४ मध्ये पुन्हा दोन्ही संघ भिडले आणि यावेळी बाबर आजमच्या संघाने बाजी मारली. आता उत्सुकता लागली आहे ती ऑस्ट्रेलियात होणाऱ्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत २३ ऑक्टोबरला होणाऱ्या सामन्याची. यावेळी रोहित सेना वर्ल्ड कप स्पर्धेतील आपला दबदबा पुन्हा कायम राखण्यासाठी प्रयत्नशील असणार आहे.
पण, त्याआधी १ ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या महिलांच्या आशिया चषक २०२२ स्पर्धेत भारत-पाकिस्तान सामन्याची मेजवानी मिळणार आहे. आशियाई क्रिकेट परिषदेचे अध्य़क्ष जय शाह ( Jay Shah) यांनी मंगळवारी ACC Women’s Asia Cup 2022 स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर केले. ही स्पर्धा १ ते १५ ऑक्टोबर दरम्यान बांगलादेशच्या सिल्हेट आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर (Sylhet International Cricket stadium) पार पडणार आहे. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वात भारतीय संघ पुन्हा एकदा मोठ्या व्यासपीठावर खेळण्यासाठी सज्ज झाला आहे. भारताने आतापर्यंत सर्वाधिक सहावेळा ही स्पर्धा जिंकली आहे. या स्पर्धेसाठी BCCI ने आज भारतीय संघाची घोषणा केली.
भारतीय महिला संघ - हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मानधना (उपकर्णधार), दिप्ती शर्मा, शेफाली वर्मा, जेमिमा रॉड्रिग्ज, सब्बिनेनी मेघना, रिचा घोष, स्नेह राणा, दयालन हेमलता, मेघना सिंग, रेणुका ठाकूर, पूजा वस्त्राकर, राजेश्वरी गायकवाड, राधा यादव, के.पी. नवगिरे. राखीव खेळाडू - तानिया सपना भाटिया, सिमरन दिल बहादूर.
भारतीय संघाचे वेळापत्रक
- १ ऑक्टोबर - भारत विरुद्ध श्रीलंका
- ३ ऑक्टोबर - भारत विरुद्ध मलेशिया
- ७ ऑक्टोबर - भारत विरुद्ध पाकिस्तान
- १० ऑक्टोबर - भारत विरुद्ध थायलंड
- १३ ऑक्टोबर - उपांत्य फेरीच्या लढती
- १५ ऑक्टोबर - अंतिम सामना