भारतीय खेळाडू पृथ्वी शॉने इंग्लंडच्या धरतीवर जबरदस्त द्विशतक झळकावले. सुरूवातीच्या ८१ चेंडूत शतक अन् पुढच्या ५० चेंडूत द्विशतकाला गवसणी घालून पृथ्वीने ऐतिहासिक खेळी केली. सध्या इंग्लंडच्या धरतीवर रॉयल लंडन वन डे कप खेळवला जात आहे. लक्षणीय बाब म्हणजे लिस्ट ए क्रिकेटमध्ये इंग्लंडमध्ये द्विशतक झळकावणारा पृथ्वी पहिला भारतीय ठरला आहे. यापूर्वी सौरव गांगुलीने १९९९साली टॉंटन येथे श्रीलंकेविरुद्ध १८३ धावा आणि कपिल देव यांनी १९८३ मध्ये झिम्बाब्वेविरुद्ध नाबाद १७५ धावा केल्या होत्या.
पृथ्वी शॉने संपवली गांगुलीची 'दादा'गिरी!WTC नंतर पृथ्वी शॉची वेस्ट इंडिज दौऱ्यावर निवड झाली नव्हती. मग भारतीय खेळाडूने आपला मोर्चा परदेशात काउंटी क्रिकेटकडे वळवला. इंग्लंड डोमेस्टिक वन-डे कप २०२३ मध्ये त्याने धमाकेदार फलंदाजी करताना द्विशतक झळकावले. पृथ्वी शॉने पुनरागमन करण्यासाठी काउंटी क्रिकेटला प्राधान्य दिले आणि नॉर्थम्प्टनशायरकडून पदार्पण केले.
सध्या नॉर्थम्प्टनशायर आणि सॉमरसेट (Northamptonshire vs Somerset) यांच्यात सामना खेळवला जात आहे. ज्यामध्ये भारतीय फलंदाज पृथ्वी शॉने नॉर्थम्प्टनशायरकडून खेळताना प्रतिस्पर्धी संघाची चांगलीच धुलाई केली. पृथ्वीने ८ षटकार आणि २४ चौकारांच्या मदतीने आपले द्विशतक पूर्ण केले.
तत्पुर्वी, नॉर्थम्प्टनशायने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पृथ्वी शॉच्या (२४४) दमदार खेळीच्या जोरावर नॉर्थम्प्टनशायने निर्धारित ५० षटकांत ८ बाद ४१५ धावा केल्या. शॉने आपल्या खेळीत ११ षटकार आणि तब्बल २८ चौकार ठोकून १५३ चेंडूत २४४ धावा केल्या.