बीसीसीआयने कालच आशियाई स्पर्धेसाठी भारताच्या पुरुष व महिला क्रिकेट संघाची घोषणा केली. चीनमध्ये होणाऱ्या या स्पर्धेसाठीच्या पुरुष क्रिकेट संघाचे कर्णधारपद ऋतुराज गायकवाडकडे सोपवण्यात आले आहे. सुरुवातीला या पदासाठी अनुभवी फलंदाज शिखर धवन ( Shikhar Dhawan) याच्या नावाची चर्चा होती, परंतु बीसीसीआयने आयपीएल २०२३ गाजवणाऱ्या युवा खेळाडूंचा आशियाई स्पर्धेसाठी विचार केला. त्यामुळे आता गब्बरच्या कारकीर्दिला फुलस्टॉप लागल्याची चर्चा सुरू झाली आहे.
आशियाई स्पर्धेदरम्यानच भारतात वन डे वर्ल्ड कप स्पर्धा होणार आहे आणि त्यामुळेच एकाच वेळी दोन संघ बीसीसीआयला मैदानावर उतरावे लागणार आहेत. म्हणूनच आशियाई स्पर्धेसाठी भारताच्या दुसऱ्या फळीच्या खेळाडूंची निवड केली गेली. निवड समिती प्रमुख अजित आगरकर यांच्या नेतृत्वाखाली २० सदस्यीय संघ निवडला गेला अन् त्यात धवनचे नाव गायब दिसले. भविष्याच्या दिशेने वाटचाल करण्यासाठी युवा खेळाडूंना अधिकाधिक संधी देण्याचा प्रयत्न बीसीसीआयने सुरू केला आहे. भारताच्या प्रमुख ट्वेंटी-२० संघातूनही रोहित शर्मा व विराट कोहली हे अनुभवी चेहेरे बराच काळ बाहेर आहेत.
२०२४ मध्ये होणाऱ्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेची ही तयारी आहे आणि त्यामुळे आशियाई स्पर्धेत ऋतुराज, यशस्वी जैस्वाल, रिंकू सिंद, तिलक वर्मा, जितेश शर्मा, आदी युवा खेळाडूंचा समावेश केला गेला आहे. त्यामुळेच आता शिखर धवनच्या निवृत्तीची वेळ जवळ आल्याची जोरदार चर्चा आहे. धवनने २०१८ मध्ये भारतासाठी कसोटी सामना, तर २०२२ मध्ये शेवटचा वन डे सामना खेळला होता. ट्वेंटी-२० सामना खेळून धवनला दोन वर्ष झाली. त्याने ३४ कसोटीत २३१५ धावा केल्या आहेत. १६७ वन डे आणि ६८ ट्वेंटी-२० सामन्यांत त्याने अनुक्रमे ६७९३ व १७५९ धावा केल्या आहेत.
आशियाई स्पर्धेसाठी निवडलेला भारताचा पुरूष संघ - ऋतुराज गायकवाड ( कर्णधार), यशस्वी जैस्वाल, राहुल त्रिपाठी, तिलक वर्मा, रिंकू सिंग, जितेश शर्मा ( यष्टिरक्षक), वॉशिंग्टन सुंदर, शाहबाज अहमद, रवी बिश्नोई, आवेश खान, अर्शदीप सिंग, मुकेश कुमार, शिवम मावी, शिवम दुबे, प्रभसिमरन सिंग ( यष्टिरक्षक); राखीव - यश ठाकूर, साई किशोर, वेंकटेश अय्यर, दीपक हुडा, साई सुदर्शन