ऑस्ट्रेलियाचा दिग्गज फलंदाज आरोन फिंच याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. फिंचने एकदिवसीय क्रिकेटमधून यापूर्वीच निवृत्ती घेतली होती. गतवर्षी सप्टेंबरमध्ये त्याने वनडेतून निवृत्तीची घोषणा केली होती. सध्या ऑस्ट्रेलियन संघ हा बॉर्डर गावसकर मालिकेसाठी भारतात आलेला आहे. त्यादरम्यान फिंचने निवृत्तीची घोषणा केल्याने ऑस्ट्रेलियन क्रिकेटला धक्का बसला आहे. मात्र फिंचचा ऑस्ट्रेलियाच्या कसोटी संघामध्ये समावेश नव्हता.
आरोन फिंचने त्याचाया क्रिकेट कारकीर्दीमध्ये ५ कसोटी, १४६ एकदिवसीय आणि १०३ टी-२० सामने खेळले. ७६ टी-२० सामन्यात संघाचं नेतृत्व करणारा तो एकमेव कर्णधार आहे. त्याने १०३ टी-२० सामन्यांमध्ये ३४.२८ च्या सरासरीने धावा काढल्या आहेत. त्यादरम्यान, त्याचा स्ट्राईक रेट हा १४२.५ एवढा राहिला आहे. २०१८ मध्ये झिम्बाब्वेविरुद्ध फिंचने ७६ चेंडूत १७२ धावा फटकावल्या होत्या.
आपल्या निवृत्तीबाबत आरोन फिंचने सांगितले की, मी २०२४ चा टी-२० विश्वचषक खेळू शकत नाही, याची मला जाणीव झाली आहे. अशा परिस्थितीत निवृत्ती स्वीकारण्यासाठी हीच योग्य वेळ आहे. त्यामुळे संघाला आपल्या पुढील रणनीतीवर काम करता येईल. माझ्या संपूर्ण कारकीर्दीदरम्यान मला पाठिंबा देणारे माझे कुटुंबीय, पत्नी, संघ आणि ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटूंचे मी आभार मानतो. तसेच मला नेहमी पाठिंबा देणाऱ्या क्रिकेटप्रेमींचेही मी आभार मानतो.
२०२१ मध्ये टी-२० वर्ल्डकप जिंकणे आणि २०१५ मध्ये क्रिकेट वर्ल्डकप जिंकणे, या माझ्या कारकिर्दीतील खास आठवणी आहेत. या १२ वर्षांमध्ये देशाकडून खेळणे, काही सर्वोत्तम खेळाडूंचा सामना करणे हे माझ्यासाठी सन्मानजनक आहे, असेही फिंचने सांगितले.