क्वेट्टा : पाकिस्तान सुपर लीगचा आठवा हंगाम 13 फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. पण आता पाकिस्तानच्या क्वेट्टा येथे झालेल्या बॉम्बस्फोटानंतर त्यांच्या तयारीला मोठा धक्का बसण्याची चिन्ह आहेत. बाबर आझमच्या नेतृत्वाखालील पेशावर झाल्मी आणि सरफराज अहमदच्या नेतृत्वाखाली क्वेटा ग्लॅडिएटर्स यांच्यात पाकिस्तान सुपर लीगचा प्रदर्शनीय सामना क्वेटा येथे खेळवला जात होता. पण सामन्याच्या मध्यावर बाबर आझमच्या नेतृत्वाखालील संघ क्षेत्ररक्षण करत असताना क्वेटा शहरात मोठा बॉम्बस्फोट झाला आणि सामना काही काळ थांबला.
पाकिस्तानात बॉम्ब हल्ल्याची मालिकाएवढेच नाही तर क्वेटाच्या काही लोकांना हा सामना आवडला नाही म्हणून त्यांनी मैदानाच्या आत दगडफेक देखील केली. ज्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. मात्र, सर्व उलथापालथ झाल्यानंतर सामना पुन्हा सुरू करण्यात पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला यश आले. पाकिस्तानी मीडिया रिपोर्ट्सनुसार, PSLच्या प्रदर्शनीय सामन्यामुळे क्वेट्टामध्ये उच्चस्तरीय सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली होती. मात्र असे असतानाही क्वेटा शहराच्या मुसा चेक पोस्टजवळ मोठा बॉम्बस्फोट झाला आणि त्यात अनेक लोक जखमीही झाले. या स्फोटानंतर सुरक्षा दलाने संपूर्ण परिसर सील केला असून या प्रकरणाचा तपास सुरू आहे.
अलीकडेच पाकिस्तानातील मशिदीत झालेल्या बॉम्बस्फोटात 80 हून अधिक लोकांचा जीव गेला होता. आज ज्यावेळी बॉम्बस्फोट झाला, त्या वेळी क्वेटा येथील स्टेडियममध्ये पाकिस्तान सुपर लीगच्या आगामी हंगामाचा प्रदर्शनीय सामना खेळला जात होता. ज्यामध्ये क्वेटाचा संघ फलंदाजी करत होता आणि डावाचे 11वे षटक टाकले जात होते. त्याचवेळी शहरात मोठा स्फोट झाला. त्यामुळे 10.3 षटकांनंतर सामना काही काळ थांबवण्यात आला.
13 तारखेपासून PSLला होणार सुरूवात पाकिस्तान सुपर लीगबद्दल भाष्य करायचे झाले तर, पीएसएलचा 8वा हंगाम 13 फेब्रुवारीपासून सुरू होत आहे. तर त्याचा अंतिम सामना 19 मार्चला होणार आहे. पाकिस्तान सुपर लीगचे सामने यावेळी पाकिस्तानमधील कराची, लाहोर, रावळपिंडी आणि मुलतान या चार शहरांमध्ये खेळवली जाणार आहे. ज्यामध्ये PSL 2023 चा पहिला सामना लाहोर कलंदर आणि मुल्तान सुल्तान यांच्यात मुल्तान क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जाईल.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"