भारताचा सुपरस्टार विराट कोहली याचा खूप मोठा चाहता वर्ग आहे. १५ वर्षांच्या आंतरराष्ट्रीय कारकीर्दित विराटने अनेक मोठमोठे विक्रम मोडले. आता वन डे वर्ल्ड कप स्पर्धेसाठी विराट सज्ज होतोय. सुरत-स्थित एका व्यावसायिकाने विराटचे अनोख्या पद्धतीने कौतुक करण्याचा निर्णय घेतला आहे. हा व्यावसायिक विराटला १.०४ कॅरेट हिऱ्याने जडलेली बॅट भेट देण्याच्या तयारीत आहे. विराटला भेट म्हणून मिळणारी डायमंड बॅट तयार होण्यासाठी एक महिना लागला. सुरतमधील हिरे व्यावसायिक हा क्रिकेटचा मोठा चाहता आहे आणि गेल्या काही वर्षांपासून तो विराटच्या खेळीच्या प्रेमात पडलेला आहे. या बॅटची किंमत सुमारे १० लाख रुपये आहे.
विराट कोहलीने आज आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १५ वर्ष पूर्ण केली. त्याने या कालावधीत भारताकडून १११ कसोटींत ४९.२९ च्या सरासरीने ८६७६ धावा केल्या आहेत. त्यात २९ शतकं व तितक्याच अर्धशतकांचा समावेश असून नाबाद २५४ ही त्याची सर्वोत्तम वैयक्तिक खेळी आहे. २७५ वन डे सामन्यांत त्याच्या नावावर ४६ शतकं व ६५ अर्धशतकं आहेत. त्याने ५७.३२ च्या सरासरीने १२८९८ धावा केल्या आहेत. ११५ ट्वेंटी-२० सामन्यांत ५२.७३ च्या सरासरीने त्याच्या नावावर ४००८ धावा असून त्यात १ शतक व ३७ अर्धशतकांचा समावेश आहे.
डायमंड टेक्नॉलॉजी तज्ञ आणि सुरतमधील लेक्सस सॉफ्टमॅक कंपनीचे संचालक उत्पल मिस्त्री यांनी डायमंड बॅट बनवण्याच्या प्रक्रियेवर देखरेख केली होती. "देशातील एका अव्वल क्रिकेटपटूला हिऱ्याची बॅट भेट द्यायची होती. प्रयोगशाळेतील हिरा आणि नैसर्गिक हिरा यातील फरक सांगणे यंत्राशिवाय खूप अवघड आहे. डोळ्यांनी बघून तुम्ही सांगू शकणार नाही," असे उत्पल मिस्त्री यांनी इंडिया टुडेला सांगितले.
Web Title: A business man from Surat set to gift a 1.04 carat diamond studded bat ahead of the World cup to Virat Kohli, It cost around 10 Lakhs
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.