बेगूसराय - भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीसह ८ जणांविरोधात बेगूसरायच्या एका कोर्टात खटला दाखल करण्यात आला आहे. हा खटला बेगूसरायमधील एसके एंटरप्रायझेसचे प्रोपायटर नीरज कुमार यांनी दाखल केला आहे.
हे प्रकरण एका कृषी उत्पादन कंपनीशी संबंधित असल्याचे सांगण्यात येत आहे. या प्रकरणात खटला दाखल करणारे बेगूसरायच्या एसके एंटरप्रायझेसचे नीरज कुमार निराला यांनी सांगितले की, न्यू उपज वर्धक इंडिया लिमिटेडने ३० लाख रुपयांहून अधिक रकमेमध्ये एका उत्पादनाचा करार त्यांच्या एजन्सीसोबत केला होता. त्यानंतर मालाची डिलिव्हरीही करण्यात आली. नीरज कुमार निराला यांनी आरोप केला की, उत्पादनाच्या विक्रीच्या क्रमामध्ये कंपनीने त्यांना सहकार्य केलेलं नाही. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर खतांचा साठा शिल्लक राहिला.
नीरज कुमार यांनी सांगितले की, कंपनीने उरलेले खत परत घेतले. तसेच त्याच्या बदल्यात ३० लाख रुपयांचा चेकही दिला. मात्र आता नीरज कुमार निराला यांनी बँकेमध्ये चेक जमा केला, तेव्हा तो बाऊन्स झाला. त्याची सूचना लीगल नोटीसद्वारे कंपनीला दिली गेली. मात्र आतापर्यंत याचं निराकरण झालेलं नाही. तसेच कंपनीनेही काही योग्य उत्तर दिलेलं नाही. त्यानंतर निराला यांनी कंपनीचे सीईओ राजेश आर्य यांच्यासह कंपनीच्या ७ इतर पदाधिकाऱ्यांविरोधात तक्रार दिली. तसेच या उत्पादनाची जाहीरात धोनीने केली होती. त्यामुळे त्यांनी धोनीविरोधातही खटला दाखल केला आहे. आता यावरील सुनावणी २८ जून रोजी होणार आहे.