Mohammad Rizwan namaz : भारतात सुरू असलेला वन डे विश्वचषक काही नाट्यमय घडामोडींमुळे चर्चेत आहे. भारताचा कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानी संघ नेहमी वादाच्या भोवऱ्यात असतो. अशातच पाकिस्तानचा यष्टीरक्षक फलंदाज मोहम्मद रिझवानने मैदानात केलेल्या एका कृतीमुळे त्याच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. रिझवानने ६ ऑक्टोबर रोजी झालेल्या सामन्यात सामन्यादरम्यान नमाज अदा केली अन् वादाला सुरूवात झाली. खरं तर हैदराबाद येथे पाकिस्तान आणि नेदरलॅंड्स यांच्यात सामना पार पडला, ज्यात शेजाऱ्यांनी विजय मिळवून विजयी सलामी दिली.
दरम्यान, लंचदरम्यान रिझवानने मैदातान नमाज अदा करून प्रेक्षकांचे लक्ष वेधले. मात्र, या आधी देखील अनेकदा रिझवानने मैदानात धार्मिक प्रार्थना केली होती. पण पाकिस्तानी फलंदाजावर आता तक्रार दाखल करण्यात आली आहे. वकील विनीत जिंदल यांनी रिझवानविरोधात अधिकृत तक्रार दाखल केली आहे. नेदरलॅंड्सविरूद्धच्या सामन्यातील रिझवानच्या वर्तनानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेकडे (ICC) औपचारिक तक्रार दाखल करण्यात आली होती. या तक्रारीच्या प्रती आयसीसी एथिक्स कमिटी, भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI) आणि पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला (PCB) पाठवण्यात आल्या आहेत. पाकिस्तानी खेळाडूवर कायदेशीर तक्रार दाखल झाल्यानंतर हा विषय चिघळला आहे. मागील वर्षी भारताविरूद्धच्या ट्वेंटी-२० सामन्यात देखील रिझवान नमाज अदा करताना दिसला होता.
मोहम्मद रिझवान अन् वाद मोहम्मद रिझवान विश्वचषकाच्या सुरूवातीपासूनच वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. त्याने श्रीलंकेविरूद्धच्या विजयानंतर एक वादग्रस्त पोस्ट केली होती. या सामन्यात रिझवान १२१ चेंडूंत ९ चौकार व ३ षटकारांच्या मदतीने १३४ धावांवर नाबाद राहिला. पाकिस्तानने ४८.२ षटकांत ६ विकेट्स राखून सामना जिंकला. सामन्यानंतर मोहम्मद रिझवानने आपली खेळी गाझामधील इस्रायल-पॅलेस्टाईन युद्धातील पीडितांना समर्पित केली. यानंतर त्याच्यासमोर अहमदाबाद येथे जय श्री रामचे नारे लगावण्यात आले.