मेलबोर्न : ऑस्ट्रेलिया यंदा चार सामन्यांची कसोटी मालिका जिंकू शकतो, कारण जसप्रीत बुमराह आणि ऋषभ पंत हे जखमी असल्याने भारत घरच्या मैदानांवर कमकुवत वाटत असल्याचे मत माजी महान फलंदाज ग्रेग चॅपेल यांनी व्यक्त केले आहे. सिडनी मॉर्निंग हेरॉल्डमधील स्तंभात चॅपेल यांनी लिहिले, ‘ऑस्ट्रेलिया मालिका विजय मिळवू शकतो. पंत आणि बुमराह जखमी असल्याने संघाबाहेर आहेत. अशावेळी विराट कोहलीवर संघ विसंबून असेल. वळण घेणाऱ्या खेळपट्ट्यांवर नाथन लियोनऐवजी एस्टन एगरला प्राधान्य द्यायला हवे. एगर हा गोलंदाजीदरम्यान बोटाच्या शैलीचा अधिक वापर करतो. अनिल कुंबळे हा वेगवान आणि लेगब्रेक चेंडू टाकत होता. त्याने ६१९ कसोटी बळी घेतले. अशा गोलंदाजांना सामोरे जाताना चुकलो तर बाद झालो याची फलंदाजांना जाणीव असते. एगरला हेच करावे लागेल.’ऑस्ट्रेलिया संघाला अनेक पैलूंवर लक्ष द्यावे लागेल, असे सावध करीत चॅपेल पुढे म्हणाले, भारतात विजय मिळविणे आता तितकेसे कठीण राहिलेले नाही. आता नियमितपणे दौऱ्यांचे आयोजन होत असून आयपीएलमुळे खेळाडूंना अनुभव मिळाला. खेळाडूंमधील गुणवत्ता आता एकमेकांना कळलेली आहे.’
‘डेव्हिड वॉर्नर फॉर्ममध्ये नाही. उस्मान ख्वाजा, ॲलेक्स केरी, ट्रॅव्हिस हेड आणि कॅमेरून ग्रीन या सर्वांनी फिरकीपटूंना निर्धाराने सामोरे जावे. स्वत:ची ताकद ओळखून फटकेबाजी करायला हवी. याशिवाय मार्नस लाबुशेन याला कारकिर्दीत सर्वात मोठ्या परीक्षेचा सामना करावा लागणार आहे. ऑस्ट्रेलिया संघात प्रतिभा आणि कौशल्याची उणीव नाही, मात्र या गोष्टी मैदानावर सिद्ध कराव्या लागतील.