रोहित नाईक
अहमदाबाद : देशभरात सर्वांचे लक्ष आयपीएल अंतिम सामन्याकडे लागले असताना रविवारी पावसाने घोळ केला आणि हा सामना सोमवारी खेळविण्यात आला. यामुळे सर्वांचीच निराशा झाली. खास चेन्नई सुपरकिंग्जचा कर्णधार महेंद्रसिंह धोनीसाठी अहमदाबादमध्ये आलेल्या क्रिकेटचाहत्यांनी येथील आपला मुक्काम नाइलाजाने एक दिवस वाढवून घेतला. का? तर महेंद्रसिंह धोनीसाठीसाठी कायपण.. अशीच एक धोनी चाहती तरुणी थेट पुण्याहून आली होती आणि धोनीसाठी तिने चक्क अर्धा दिवस अहमदाबाद रेल्वे स्टेशनवर काढला.
अमृता मोरे असे या तरुणीचे नाव असून, ती हिंजवडी येथे आयटी क्षेत्रात काम करते. लहानपणापासून खेळाची आवड असलेल्या अमृताला धोनीचे प्रचंड वेड आहे. अमृताने अनेक स्टेडियम्समध्ये जाऊन धोनीचा प्रत्यक्ष खेळ पाहिला आहे. यंदाची आयपीएल धोनीची अखेरची आयपीएल असल्याचे म्हटले जात आहे. मात्र, अमृता म्हणते, ‘नाही, तो आमच्यासाठीही पुढच्या वर्षीही नक्की खेळेल. तो इतक्यात खेळ सोडणार नाही. मला थोडी आशा आहे की, धोनी पुढच्यावर्षीही खेळेल.’
पावसामुळे अहमदाबादमधील मुक्काम वाढला असून, याविषयी अमृता म्हणाली की, ‘मी रविवारी सकाळी अहमदाबाद स्टेशनजवळील एका हॉटेलमध्ये थांबली होती. हे शहर मुलींसाठी सुरक्षित असल्याचे अनेकांनी सांगितल्याने चिंता नव्हती. पण, मनात थोडी भीतीही होती. तरी मी धोनीसाठी धाडस केले. रविवारी स्टेडियमवर पोहोचेपर्यंत जोरदार पाऊस सुरू झाला होता. मी शेवटपर्यंत प्रतीक्षा केली आणि अखेर सामना पुढच्या दिवशी खेळविण्यात येणार असल्याचे जाहीर झाल्यानंतर परतले. सकाळी हॉटेलमधून चेकआउट केल्यानंतर माझे सामान रेल्वे स्टेशनमध्ये वेटिंग रूममध्ये ठेवले आणि संध्याकाळी पुन्हा धोनीसाठी स्टेडियम गाठणार आहे.’
धोनीसाठी आले अश्रू
माहीसोबत कधी भेटण्याचा योग आला आहे का, असे विचारले असता अमृता म्हणाली की, ‘एकदा संधी मिळाली होती; पण भेट शक्य झाली नाही.’ यानंतर अमृता खूप भावनिक झाली आणि तिला अश्रू अनावर झाले. धोनीसाठी अश्रू का? यावर अमृताने सांगितले की, ‘धोनीने भारताचे नाव उज्ज्वल केले आहे. त्याने माझ्यासारख्या अनेकांना प्रेरित केले आहे. त्याचा जीवनप्रवास प्रेरणादायी असून, तो कायम प्रोत्साहन देतो.’
स्टेशन परिसरात सीएसकेचे पाठीराखे
अहमदाबाद स्टेशनवर चेन्नई सुपरकिंग्जची जर्सी परिधान केलेले अनेक पाठीराखे दिसून आले. यामध्ये दक्षिण भारतीय मोठ्या प्रमाणात होते. रविवारचा सामना पावसामुळे स्थगित झाल्यानंतर या सर्वांनीच अहमदाबादमधील मुक्काम एक दिवसाने वाढवला होता. यासाठी ट्रेन तिकीट रद्द करून एक दिवस अहमदाबाद स्टेशनवर घालवला. का? तर धोनीसाठी कायपण!
Web Title: a cricket-crazy girl traveled from Pune to Ahmedabad to watch MS Dhoni play in the IPL 2023 final
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.