Join us  

'करा किंवा मरा'चा सामना! RCBला नमवून पराभवाचा वचपा काढण्याचे मुंबईसमोर आव्हान

mi vs rcb head to head : सध्या आयपीएलच्या सोळाव्या हंगामाचा थरार रंगला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 08, 2023 7:39 PM

Open in App

MI vs RCB Match Prediction । मुंबई : सध्या आयपीएलच्या (IPL 2023) सोळाव्या हंगामाचा थरार रंगला आहे. मंगळवारी या स्पर्धेत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि मुंबई इंडियन्स यांच्यात सामना होत आहे. मुंबईचा संघ आपल्या घरच्या मैदानावर अर्थात वानखेडे स्टेडियमवर विजय मिळवून पराभवाचा वचपा काढणार का हे पाहण्याजोगे असेल. लक्षणीय बाब म्हणजे हा सामना दोन्हीही संघांसाठी 'करा किंवा मरा' असा असणार आहे. कारण यंदाचा हंगाम आता अंतिम टप्प्यात येऊन पोहचला आहे. या हंगामातील पहिल्या सामन्यात आरसीबीने मुंबईचा पराभव केला होता. त्यामुले मुंबईचा संघ पराभवाचा बदला घेण्याच्या इराद्याने मैदानात उतरेल.

आताच्या घडीला दोन्हीही संघांचे समान १० गुण आहेत. आरसीबीचा संघ पाचव्या तर मुंबई सहाव्या स्थानावर आहे. दोन्हीही संघ आपल्या शेवटच्या सामन्यात पराभूत झाले आहेत. आरसीबीला दिल्लीविरूद्ध तर मुंबईला चेन्नईकडून पराभव स्वीकारावा लागला होता.

दरम्यान, आरसीबी आणि मुंबई इंडियन्स या दोन्हीही संघांनी आतापर्यंत १० सामने खेळले आहेत. त्यामुळे मंगळवारी होणाऱ्या सामन्यात पराभूत होणारा संघ प्ले ऑफच्या शर्यतीतून बाहेर होण्याची शक्यता आहे. कारण हा सामना झाल्यानंतर दोन्हीही संघ फक्त ३ सामने खेळतील. त्यामुळे पराभूत होणाऱ्या संघाने पुढील तिन्ही सामने जिंकले तरी त्यांना १८ गुणांचा आकडा गाठता येणार नाही. खरं तर पराभूत होणाऱ्या संघाला प्ले ऑफमध्ये स्थान मिळवण्यासाठी इतर संघांवर अवलंबून राहावे लागू शकते. त्यामुळेच मुंबई आणि आरसीबी दोन्हीही संघासाठी हा सामना 'करा किंवा मरा' असा आहे. तर विजयी संघ १२ गुणांसह गुणतालिकेत भरारी घेऊन प्ले ऑफच्या शर्यतीत कायम राहिल. 

मुंबई पराभवाचा बदला घेणार?यंदाच्या हंगामात २ एप्रिल रोजी आयपीएलच्या पाचव्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि मुंबई इंडियन्स यांच्यात चुरशीची लढत झाली होती. या सामन्यात मुंबईने प्रथम फलंदाजी करताना १७१ धावा केल्या. आव्हानाचा पाठलाग करताना बंगळुरूने २२ चेंडू शिल्लक असताना १७२ धावांचे लक्ष्य २ गडी गमावून गाठले आणि सामना ८ गडी राखून जिंकला. हा सामना दोन्ही संघांचा सलामीचा सामना होता. त्यामुळे आता आरसीबीला नमवून पराभवाचा बदला घेण्याचे आव्हान रोहितसेनेसमोर आहे. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

   

टॅग्स :आयपीएल २०२३मुंबई इंडियन्सरॉयल चॅलेंजर्स बेंगलोरविराट कोहलीरोहित शर्मा
Open in App