यंदाच्या विश्वचषक स्पर्धेतील उपांत्य सामन्यात भारतीय संघाने अफलातून खेळी करत टीम इंडियाला विजय मिळवून दिला. त्यामुळे, भारताने अंतिम सामन्यात प्रवेश केला आहे. सेमी फायनलमधील सामन्यात कोहलीने विराट विक्रम केला. तर, मोहम्मद शमीच्या गोलंदाजीने भारतीयांसह जगभऱातील क्रिकेटप्रेमींची मने जिंकली. शमीने न्यूझिलंडच्या ७ विकेट्स घेतल्या. त्यामुळे, भारताचा विजय सोपा झाला आणि टीम इंडियाने ७० धावांनी सामना जिंकला.
विश्वचषकातील भारतीय संघाच्या कामगिरीवर सर्वच भारतीयांना अभिमान वाटत आहे. भारताच्या अंतिम फेरीतील प्रवेशानंतर आणि मोहम्मद शमीच्या गोलंदाजीने मिळालेल्या विजयानंतर स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही ट्विट करुन टीम इंडिया आणि शमीचं कौतुक केलं आहे. शमीने न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात ७ गडी बाद करत विश्वचषक स्पर्धेत नवा विक्रम रचला.
भारताच्या मोठ्या विजयानंतर सोशल मीडियावर मीम्सचा पूर आल्याचे दिसते. चाहते विराट कोहली आणि मोहम्मद शमी यांच्या खेळीचा आनंद लुटत आहेत. त्यातच, एका युजर्संच ट्विट व्हायरल होत असून त्याने शमीच्या गोलंदाजीबद्दल अगोदरच भाकीत केलं होतं, जे खरं ठरलं आहे. मी एक स्वप्न पाहिलं होतं, आणि भारत वि. न्यूझीलंड सामन्यानंतर ते स्वप्न सत्यात उतरलं आहे. या युजर्सने उपांत्य सामन्याबद्दल एक ट्विट केलं होतं. १४ नोव्हेंबर रोजी करण्यात आलेल्या या ट्विटमध्ये, मोहम्मद शमी उपांत्य सामन्यात ७ विकेट्स घेईन, असं स्वप्न मला पडलं होतं, असे युजर्सने म्हटले होते. आता, ते ट्विट व्हायरल झाले आहे. Don Mateo असं या ट्विटर युजर्संचं नाव असून त्याची भविष्यवाणी खरी ठरल्याने अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं आहे.
पोलिसांकडूनही शमीची फिरकी
दिल्ली आणि मुंबई पोलिसांनी देखील भारती संघाच्या विजयी आनंदात सहभाग घेतला. दिल्ली पोलिसांनी सोशल मीडियावर एक पोस्ट करून याची सुरूवात केली. मुंबई पोलिसांना टॅग करताना दिल्ली पोलिसांनी लिहले, "मुंबई पोलीस आम्हाला आशा आहे की, न्यूझीलंडविरूद्धच्या हल्ल्यासाठी तुम्ही मोहम्मद शमीवर FIR दाखल करणार नाही." मुंबई पोलिसांनी देखील दिल्ली पोलिसांना त्यांच्याच शैलीत उत्तर दिले. "दिल्ली पोलीस, तुम्ही कित्येक लोकांची मने चोरण्यासाठी कलम लावायला विसरलात आणि सहआरोपींची यादी देखील दिली नाही", असे मुंबई पोलिसांनी म्हटले. त्यानंतर काही वेळातच मुंबईचे विशेष आयुक्त देवेन भारती यांनी देखील यामध्ये उडी घेतली. ते म्हणाले की, दिल्ली पोलीस असे बिल्कुल नाही. ते स्वसंरक्षणाच्या अधिकाराखाली संरक्षणासाठी योग्यच आहे. एकूणच शमीसह भारतीय संघाच्या विजयाचा पोलिसांनीही आनंद लुटला.