भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्यादरम्यान एका अतिउत्साही चाहत्याने रोहित शर्माकडे एक अजब मागणी केली. आयपीएलच्या आगामी हंगामात कोणत्या संघाकडून खेळणार असे विचारताना संबंधित चाहत्याने हिटमॅनला आरसीबीमध्ये येण्याचा सल्ला दिला. रोहित ड्रेसिंग रुमच्या दिशेने जात असताना त्याला एका चाहत्याने प्रश्न केला. अलीकडेच ट्वेंटी-२० विश्वचषक २०२४ मध्ये भारतीय संघाला विश्वविजेते बनवणारे गोलंदाजी प्रशिक्षक पारस म्हांब्रे यांची मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात घरवापसी झाली आहे. ते इंडियन प्रीमिअर लीगच्या आगामी हंगामात गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून काम पाहतील.
दरम्यान, रोहित भाई, आयपीएलमध्ये कोणत्या संघातून खेळणार? चाहत्याच्या या प्रश्नावर रोहितने तुला कोणत्या संघातून खेळताना पाहायचे आहे ते सांग असे उत्तर दिले. मग काय हिटमॅनने उत्तर देताच चाहत्याने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुमध्ये येण्याची मागणी केली. चाहत्याचे हे उत्तर ऐकल्यानंतर रोहितने पुढे बोलणे टाळले अन् तो तिथून निघून गेला.
काही दिवसांपूर्वीमुंबई इंडियन्सच्या संघाने एक महत्त्वाचा निर्णय घेतला. दक्षिण आफ्रिकन मार्क बाऊचरच्या जागी मुंबईने श्रीलंकेचा दिग्गज महेला जयवर्धने (Mahela Jayawardene) याला संघाचा मुख्य प्रशिक्षक केले. लवकरच आयपीएलचा मेगा लिलाव होणार आहे. बीसीसीआयच्या नवीन नियमावलीनुसार यंदाचा लिलाव फार वेगळा असेल.
IPL चे नवीन नियम काय आहेत?IPLच्या नव्या नियमानुसार, प्रत्येक संघ लिलावाआधी ५ आंतरराष्ट्रीय खेळाडू आणि १ अनकॅप्ड (अद्याप आंतरराष्ट्रीय संघात न खेळलेला) खेळाडू संघात कायम ठेवू शकतात. प्रत्येक संघाला जास्तीत जास्त १२० कोटी रुपयांची मर्यादा आहे. रिटेन केलेल्या आंतरराष्ट्रीय खेळाडूंपैकी पहिल्या खेळाडूला १८ कोटी, दुसऱ्या खेळाडूला १४ कोटी आणि तिसऱ्याला ११ कोटी द्यावे लागतील. पुन्हा चौथ्या खेळाडूसाठी १८ कोटी तर पाचव्या खेळाडूसाठी १४ कोटींची किंमत मोजावी लागेल. तसेच अनकॅप्ड भारतीय खेळाडूला रिटेन करण्यासाठी ४ कोटी मोजावे लागतील.