Join us  

PAK vs ENG:इंग्लंडच्या संघाला सुरक्षेची चिंता! दौऱ्यापूर्वी ५ सदस्यांचे तपास पथक देणार पाकिस्तानला भेट

इंग्लंडचा संघ ७ सामन्यांची टी-२० मालिका खेळण्यासाठी सप्टेंबर महिन्यात पाकिस्तानचा दौरा करणार आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2022 5:41 PM

Open in App

नवी दिल्ली जोस बटलरच्या नेतृत्वात इंग्लंडचा संघ सप्टेंबरमध्ये पाकिस्तान दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यामध्ये दोन्ही संघामध्ये ७ टी-२० सामने खेळवले जातील. मात्र या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर सुरक्षेसाठी ईसीबीचे (ECB) ५ सदस्यीय तपास पथक पाकिस्तानला भेट देणार आहे. ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या टी-२० विश्वचषकामुळे ही मालिका बहुचर्चित ठरत आहे. परंतु इंग्लंड ॲण्ड वेल्स क्रिकेट बोर्डाला (ECB) पाकिस्तानातील सुरक्षेबाबत शंका असल्याने खबरदारी म्हणून ईसीबीचे पथक १७ जुलै रोजी पाकिस्तानात जाणार आहे. पाकिस्तानकडे यजमानपद असल्यावर प्रत्येक संघ सुरक्षेच्या बाबतीत सतर्क असतो. मागील काही दिवसांपूर्वी ऑस्ट्रेलियाच्या संघाने मोठ्या कालावधीनंतर पाकिस्तानचा दौरा केला होता. 

क्रिकेट पाकिस्तानने दिलेल्या माहितीनुसार, ईसीबीचे ५ सदस्यांचे तपास पथक १७ जुलैला पाकिस्तानात दाखल होईल. या पथकामध्ये प्लेयर्स असोसिएशन, सिक्युरिटी आणि क्रिकेट ऑपरेंशन्स यांच्या सदस्यांचा समावेश असेल. कराची, लाहोर, मुल्तान आणि इस्लामाबादमधील स्थळांची यावेळी पाहणी करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे पथकाने दिलेल्या रिपोर्टनुसारच इंग्लिश संघाचे पुढील नियोजन असणार आहे. माहितीनुसार, टी-२० सामने फक्त दोनच स्थळांवर खेळवण्याची दाट शक्यता आहे, यामध्ये कराची आणि लाहोर या शहरांचा समावेश आहे. 

१५ सप्टेंबरला संघ होणार दाखलदरम्यान, इंग्लंडचा संघ पाकिस्तानविरूद्धच्या मालिकेसाठी १५ सप्टेंबर रोजी पाकिस्तानात दाखल होणार असल्याचं बोललं जात आहे. टी-२० सामन्यांचा थरार २० सप्टेंबर ते २ ऑक्टोंबर यादरम्यान होणार आहे. यानंतर इंग्लिश संघ पुन्हा मायदेशी परतेल आणि विश्वचषकाला सामोरा जाईल. मात्र विश्वचषकानंतर इंग्लिश संघ पुन्हा एकदा ३ सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी पाकिस्तान दौऱ्यावर जाईल. 

बाबर आझमच्या नेतृत्वातील पाकिस्तानचा संघ सध्या श्रीलंका दौऱ्यावर आहे. लक्षणीय बाब म्हणजे श्रीलंकेत आर्थिक संकट ओढवलं असताना देखील तिथे उद्यापासून दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेचं बिगुल वाजणार आहे. पहिला कसोटी सामना गॉलमध्ये खेळवला जाईल. दरम्यान, वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमुळे ही मालिका दोन्ही संघासाठी अतिशय महत्त्वाची असणार आहे. अलीकडेच श्रीलंका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील २ कसोटी सामन्यांची मालिका पार पडली, ज्यामधील दुसऱ्या सामन्यात श्रीलंकेने विजय मिळवून मालिकेत १-१ ने बरोबरी साधली. 

टॅग्स :इंग्लंडपाकिस्तानबाबर आजमजोस बटलरटी-20 क्रिकेटट्वेंटी-२० वर्ल्ड कप २०२१
Open in App