rohit sharma funny video । मुंबई : सध्या आयपीएलच्या सोळाव्या हंगामाचा थरार रंगला आहे. आयपीएलच्या इतिहासातील १००० वा सामना जिंकून मुंबई इंडियन्सच्या संघाने कमाल केली. अखेरच्या षटकापर्यंत रंगलेल्या या सामन्यात टीम डेव्हिड (tim david) राजस्थानच्या संघासाठी काळ ठरला. तत्पुर्वी, यशस्वी जैस्वालने (yashasvi jaiswal) शानदार शतक ठोकून मुंबईच्या गोलंदाजांना घाम फोडला. संजू सॅमसनने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. आपल्या कर्णधाराचा निर्णय योग्य ठरवत जैस्वालने एकतर्फी झुंज दिली. एकिकडे मुंबईच्या गोलंदाजांसमोर कोणत्याच राजस्थानच्या फलंदाजाचा टिकाव लागत नव्हता. तर दुसरीकडे जैस्वाल यशस्वी खेळी करून यजमानांचा चांगलाच समाचार घेत होता.
सामन्यानंतर कर्णधार रोहित शर्माने प्रेझेंटेशनदरम्यान समालोचक हर्षा भोगले यांची फिरकी घेतल्याचे पाहायला मिळाले. रोहितला वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना हर्षा यांनी म्हटले, रोहित तुझ्या ३६व्या वाढदिवसादिवशी विजय मिळाला... यावर रोहितने भन्नाट उत्तर दिले, जे पाहून एकच हशा पिकला.
रोहित आणि हर्षा यांचा भन्नाट संवाद
- हर्षा - तुझ्या ३६व्या वाढदिवसादिवशी विजय मिळाला.
- रोहित - ३५वा आहे, ३६वा नाही.
- हर्षा - ओह, त्यांनी मला एक जास्त सांगितले.
- रोहित - नाही, ३६वाच आहे, मी मस्करी करत होतो.
रोहितने असे बोलताच एकच हशा पिकला. या संवादाचा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. विजयानंतर रोहित शर्माने आपल्या संघातील खेळाडूंचे विशेष कौतुक केले. रोहितने टीम डेव्हिड आणि सूर्यकुमार यादव यांचे कौतुक करताना म्हटले, "डेव्हिडने पोलार्डसारखी फलंदाजी करून तो जो काम करायचा ते आज केले आहे. एवढे वर्षे पॉलीने आम्हाला चॅम्पियन बनवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली."
काल झालेल्या सामन्यात राजस्थान रॉयल्सने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित २० षटकांत ७ बाद २१२ धावा केल्या. यशस्वी जैस्वालने ६२ चेंडूत १२४ धावांची शानदार शतकी खेळी केली. २१३ धावांच्या विशाल आव्हानाचा पाठलाग करताना मुंबईला सुरूवातीला मोठे धक्के बसले. कर्णधार रोहित शर्मा (३) धावा करून वादग्रस्त निर्णयाचा शिकार ठरला. तर इशान किशनला (२८) रविचंद्रन अश्विनने बाहेरचा रस्ता दाखवला. मग कॅमेरून ग्रीन आणि सूर्यकुमार यादव यांनी डाव सावरला आणि विजयाकडे कूच केली. ग्रीनने ४४ तर सूर्याने २९ चेंडूत ५५ धावांची अप्रतिम खेळी केली. अखेरच्या काही षटकांमध्ये तिलक वर्माने सावध खेळी करत टीम डेव्हिडला साथ दिली. डेव्हिडने १४ चेंडूत ४५ धावा करून मुंबईच्या विजयावर शिक्कामोर्तब केला.
टीम डेव्हिडची अप्रतिम खेळी
अखेरच्या षटकांत मुंबई इंडियन्सला विजयासाठी १७ धावांचे आव्हान होते. टीम डेव्हिडकडे मुंबईच्या चाहत्यांच्या नजरा लागल्या होत्या. तर संजू सॅमसनने जेसन होल्डरवर विश्वास दाखवत अखेरचे षटक त्याला दिले. होल्डरने टाकलेला पहिलाच चेंडू सीमारेषेबाहेर लावण्यात डेव्हिडला यश आले. खरं तर होल्डरने तिन्ही चेंडू फुल टॉस टाकले, ज्याचा डेव्हिडने पुरेपुर फायदा उचलला. ३ चेंडूत ३ षटकार ठोकून डेव्हिडने राजस्थानला पराभवाची धूळ चारली आणि मुंबईच्या संघाने आपल्या कर्णधाराला वाढदिवसादिवशी विजयी भेट दिली.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"
Web Title: A funny video of Mumbai Indians captain Rohit Sharma and commentator Harsha Bhogle after the rr vs mi match in IPL 2023 is going viral
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.