मतीन खान, स्पोर्ट्स हेड, सहायक उपाध्यक्ष, लोकमत पत्रसमूह -चतुर, चालाख, चंचल चहलने आपल्या करिश्माई फिरकीच्या जोरावर आयपीएलमधील २१व्या हॅट्ट्रिकची नोंद केली आणि सोमवारी राजस्थानला केकेआरविरुद्ध एकहाती विजय मिळवून दिला. यासोबतच आयपीएलच्या इतिहासातला हॅट्ट्रिक घेणारा तो १९ वा गोलंदाज ठरला. विशेष म्हणजे अमित मिश्रा याने तीनदा, तर युवराज सिंगने दोनदा आयपीएलमध्ये हॅट्ट्रिक घेण्याचा पराक्रम केला होता. तसेच तुम्हाला आश्चर्य वाटेल, पण हिटमॅन रोहित शर्माच्या नावावरही एका हॅट्ट्रिकची नोंद आहे. गंमत म्हणजे त्याने २००९ च्या सत्रात डेक्कन चार्जस हैदराबाकडून खेळताना सध्याच्या त्याच्या मुंबई इंडियन्सविरुद्धच हा कारनामा केला होता. रोहितने आपल्या हॅट्ट्रिकमध्ये अभिषेक नायर, हरभजन सिंग आणि सौरभ तिवारी यांचे बळी घेतले होते. त्या सामन्यामध्ये त्याने केवळ ६ धावांच्या मोबदल्यात मुंबईच्या ४ फलंदाजांना माघारी धाडण्याची कामगिरी केली. चला तर मग एक नजर टाकूयात आयपीएलच्या हॅट्ट्रिकवीरांवर....
भारतीय खेळाडूंच्या हॅट्ट्रिक पराक्रमाशी ‘नागपूर’चे खास नाते -- चेतन शर्मा यांनी १९८७ विश्वचषकात भारतासाठी पहिली हॅट्ट्रिक घेत इतिहासांच्या पानांमध्ये आपल्या नावाची नोंद केली. भारताच्या या वेगवान गोलंदाजाने ३१ ऑक्टोबर १९८७ ला नागपुरात खेळताना न्यूझीलंडविरुद्धच्या शेवटच्या साखळी सामन्यात हा कारनामा केला होता. यावेळी शर्मा यांनी न्यूझीलंडच्या रुदफोर्ड, इयान स्मिथ आणि चॅटफिल्ड यांना तंबूचा रस्ता दाखवला.- त्यानंतर दीपक चाहरने १० नोव्हेंबर २०१९ ला बांगलादेशविरुद्ध नागपूरला झालेल्या सामन्यात हॅट्ट्रिकची नोंद केली होती. विशेष म्हणजे आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये हॅट्ट्रिक घेणारा तो भारताचा एकमेव गोलंदाज आहे. बांगलादेश विरुद्धच्या या सामन्यात त्याने २० चेंडूमध्ये केवळ ७ धावा देत ६ बळी घेण्याचा भीमपराक्रम केला होता. आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमधली चाहरची ही आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी आहे.
हॅट्ट्रिकबाबतची काही रंजक माहिती- टेस्ट क्रिकेटमध्ये १८७९ साली पहिल्या हॅट्ट्रिकची नोंद करण्यात आली होती. तो टेस्ट क्रिकेटच्या इतिहासातला केवळ तिसरा सामना होता. ही ऐतिहासिक कामगिरी करणाऱ्या खेळाडूचे नाव होते फ्रेड स्पोफोर्थ (टोपणनाव ‘द डेमन बॉलर’). ऑस्ट्रेलियाच्या या खेळाडूने मेलबर्न टेस्टमध्ये सलग तीन चेंडूंमध्ये तीन इंग्लिश फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवला होता.
- भारताचा माजी वेगवान गोलंदाज इरफान पठाणने २००६ साली कसोटी सामन्याच्या पहिल्या षटकात पाकिस्तानविरुद्ध हॅट्ट्रिक घेत खळबळ माजवली होती. सलमान बट्ट, युसूफ योहाना आणि युनूस खान हे पाकिस्तानचे दिग्गज फलंदाज इरफानचे शिकार ठरले होते. महत्त्वाचे म्हणजे सामन्याच्या पहिल्याच षटकात हॅट्ट्रिक घेणारा इरफान हा क्रिकेट इतिहासातला एकमेव गोलंदाज आहे.
हरभजनने २००१ला ऐतिहासिक कोलकाता कसोटीत ऑस्ट्रेलियाविरुद्ध हॅट्ट्रिक घेतली होती. अलीकडचा विचार करायचा झाल्यास जसप्रीत बूमराहने जैमकाच्या मैदानावर २०१९ या वर्षी वेस्ट इंडिजविरुद्धच्या कसोटीत सामन्यात असा पराक्रम केला होता.
- चेतन शर्मांनंतर कपिल देव, कुलदीप यादव आणि मोहम्मद शमी या भारतीय गोलंदाजांनी हॅट्ट्रिक घेण्याची कामगिरी केलेली आहे. मोहम्मद शमी तर एकदिवसीय क्रिकेटमध्ये विदेशात हॅट्ट्रिक घेणारा पहिला भारतीय गोलंदाज ठरला. त्याने २०१९च्या विश्वचषकात साऊथअप्टन येथे अफगाणिस्तानविरुद्ध हा कारनामा केला होता.- महिलांच्या क्रिकेटमध्ये एकता बिष्टने टी-२० प्रकारात भारतीय संघासाठी एकमेव हॅट्ट्रिक घेतलेली आहे.
हॅट्ट्रिक घेणे म्हणजे काही साधेसरळ काम नाही. यासाठी तुमच्यात असलेला प्रतिभेला नशिबाची साथही मिळायला हवी. तेव्हाच हॅट्ट्रिकचा दुग्धशर्करा योग एखाद्या गोलंदाजाच्या आयुष्यात येऊ शकतो.
इतनी आसानी से कहां अहले हुनर खुलते हैंबुलंदियों पर होता हूं तब मेरे पर खुलते हैं
‘हॅट’वरून हॅट्ट्रिक हॅट्ट्रिक हा शब्द सर्वप्रथम १८५८ साली वापरला गेला. हाइड पार्कवर ऑल इंग्लंड एकादशकडून खेळताना जेव्हा एच. एच. स्टिफेन्सनने हॉलम संघाचे सलग तीन चेंडूंवर तीन गडी बाद केले तेव्हा पहिल्यांदाच या शब्दाचा वापर केला गेला. या कामगिरीसाठी सामना संपल्यानंतर स्टिफेन्सन यांना पुरस्कार म्हणून हॅट देण्यात आली.
आयपीएल हॅट्ट्रिक लिस्ट -खेळाडू (संघ) विरुद्ध वर्षलक्ष्मीपती बालाजी (चेन्नई) पंजाब २००८अमित मिश्रा (दिल्ली) हैदराबाद २००८मखाया एनटीनी (चेन्नई) कोलकाता २००८युवराज सिंग (पंजाब) बंगळुरू २००९रोहित शर्मा (हैदराबाद) मुंबई २००९युवराज सिंग (पंजाब) हैदराबाद २००९प्रवीण कुमार (बंगळुरू) राजस्थान २०१०अमित मिश्रा (हैदराबाद) पंजाब २०११अजित चंडिला (राजस्थान) पुणे २०१२सुनील नरेन (कोलकाता) पंजाब २०१३अमीत मिश्रा (हैदराबाद) पुणे २०१३प्रवीण तांबे (राजस्थान) कोलकाता २०१४शेन वॉटसन (राजस्थान) हैदराबाद २०१४अक्षर पटेल (पंजाब) गुजरात २०१६ॲन्ड्र्यु टाय (गुजरात) पुणे २०१७सॅम्युअल बद्री (बंगळुरु) मुंबई २०१७जयदेव उनाडकट (पुणे) हैदराबाद २०१७सॅम करन (पंजाब) दिल्ली २०१९श्रेयस गोपाल (राजस्थान) बंगळुरू २०१९हर्षल पटेल (बंगळुरू) मुंबई २०२१युजवेंद्र चहल (राजस्थान) कोलकाता २०२२