गुडघ्याच्या जखमेमुळे पाच महिने बाहेर राहिलेल्या अष्टपैलू रवींद्र जडेजाने यशस्वी पुनरागमन करीत कारकिर्दीत ११ व्यांदा अर्धा संघ बाद करण्याची किमया साधली. त्याच्या साहसी कामगिरीमुळे भारताने गुरुवारी सुरू झालेल्या बॉर्डर-गावसकर टॉफी चार सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यात पहिल्याच दिवशी ऑस्ट्रेलियाचा धावांत खुर्दा उडविला. यानंतर दिवसअखेर २४ घटकांत १ बाद ७७ धावा केल्या.
अपेक्षेप्रमाणे विदर्भ क्रिकेट संघटनेच्या जामठा स्टेडियमवर फिरकीपटूंनी वर्चस्व गाजविले. आज एकूण ११ गडी बाद झाले. त्यात फिरकीपटूंनी नऊ फलंदाजांना माघारी धाडले. जडेजाने ४७ धावांत पाच तर रविचंद्रन अश्विनने ४२ धावांत तीन गडी बाद केले. ऑस्ट्रेलियाकडून ऑफ ब्रेक टॉड मर्फी याने भारताचा उपकर्णधार लोकेश राहुल (२०) याचा बळी घेतला. रोहित ५६ धावांवर नाबाद असून, दुसऱ्या टोकावर असलेल्या 'नाईट वॉचमन' अश्विनने अद्याप खाते उघडलेले नाही. भारत शंभर धावांनी मागे असून, नऊ फलंदाज शिल्लक आहेत.
Ravindra Jadeja: ...म्हणून भर सामन्यात रवींद्र जडेजाने बोटावर लावले मलम; बीसीसीआयची महत्वाची माहिती
पहिला कसोटी सामना सुरु होण्याआधीपासूनच खेळपट्टीवरुन ऑस्ट्रेलिया मीडिया टीका करत आहेत. याचदरम्यान आता हा सामना खेळत असलेला ऑस्ट्रेलियाचा फलंदाज पीटर हैंड्सकोम्ब याने आम्हाला खेळपट्टीने फसविल्याची कबुली माध्यमांसमोर दिली आहे. या खेळपट्टीवर फिरकीचा बोलबाला' असेल याची चर्चा होती. नेमके तेच घडल्यामुळे ऑस्ट्रेलियाची घोर निराशा झाली. पाहुण्या संघातील अनेक फलंदाज खराब फटके खेळून बाद झाले. फलंदाजी करणे सोपे नव्हते. खेळपट्टीमुळे आमच्या मनात धाकधूक होती, असे पीटर हैंड्सकोम्ब म्हणाला.
खेळपट्टी वळण घेत नव्हती- जडेजा
व्हीसीएच्या खेळपट्टीवर उसळी आणि वळण नसले, तरी चेंडू हातातून चांगला सुटत होता. चेंडूची दिशा आणि उप्पादेखील अचूक होता. त्यामुळे 'विकेट टू विकेट गोलंदाजी करीत होतो. उसळी नसल्यामुळे त्रिफळाबाद आणि पायचीत करण्याची मी शक्कल शोधून काढली. सुदैवाने तसे घडलेदेखील मी माझ्या कामगिरीवर खूश आहे, असे रवींद्र जडेजाने पाच गडी बाद केल्यानंतर सांगितले.
...म्हणून जडेजाने बोटाला मलम लावले-
रवींद्र जडेजा नागपूर कसोटीतील पहिल्या दिवसाचा हिरो ठरला. जडेजाने ऑस्ट्रेलियाच्या पाच फलंदाजांना बाद केले. पण आता जडेजाचा तो व्हिडीओ व्हायरल झाला आहे. जडेजाच्या या संशयास्पद कृतीमुळे अनेक प्रश्न नेटकऱ्यांकडून उपस्थित केले जात आहेत. बीसीसीआयच्या सूत्रांनी मात्र बोटाला दुखापत असल्याने त्यावर उपाय म्हणून जडेजाने मलम लावले, असे स्पष्ट केले. ऑस्ट्रेलिया मीडियाकडून आधीच नागपूरच्या खेळपट्टीवरून टीम इंडियावर आरोप करण्यात येत होते. आता ऑस्ट्रेलिया मीडियाला आयता मुद्दाच हाती लागला आहे.