नवी दिल्ली : सध्या विजय हजारे ट्रॉफीच्या स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरीचा सामना खेळवला जात आहे. आजचा सामना महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेश यांच्यात होत आहे. महाराष्ट्राच्या संघाने प्रथम फलंदाजी करताना ५० षटकांत ५ बाद ३३० धावा केल्या आहेत. सलामीवीर ऋतुराज गायकवाडने केलेल्या शानदार खेळीच्या जोरावर महाराष्ट्राने ३०० पार धावसंख्या केली. मराठमोळ्या ऋतुराजने १५९ चेंडूत २२० धावांची नाबाद खेळी केली. खरं तर ऋतुराजशिवाय कोणत्याच महाराष्ट्राच्या फलंदाजाला मोठी खेळी करता आली नाही.
तत्पुर्वी, उत्तर प्रदेशच्या संघाने नाणेफेक जिंकून महाराष्ट्राला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. महाराष्ट्राकडून ऋतुराज गायकवाडने सर्वाधिक २२० धावांची नाबाद द्विशतकी खेळी केली. तर अंकित बावणे आणि अजीम काझी यांनी प्रत्येकी ३७-३७ धावा करून संघाला मजबूत स्थितीत नेले. कार्तिक त्यागीशिवाय उत्तर प्रदेशच्या कोणत्याच गोलंदाजाला प्रभावी कामगिरी करता आली नाही. त्यागीने सर्वाधिक ३ बळी पटकावले, तर अंकित राजपूत आणि शिवम शर्मा यांना प्रत्येकी १-१ बळी घेण्यात यश आले. आता उत्तर प्रदेशच्या संघासमोर विजयासाठी ३३१ धावांचे तगडे आव्हान असणार आहे. लक्षणीय बाब म्हणजे ऋतुराज गायकवाडने त्याच्या खेळीत तब्बल १६ षटकार आणि १० चौकार मारले. याशिवाय ऋतुराज गायकवाडने एकाच षटकांत ७ षटकार ठोकले आणि ४३ धावा केल्या.
आजच्या सामन्यासाठी महाराष्ट्राचा संघ -ऋतुराज गायकवाड (कर्णधार), राहुल त्रिपाटी, सत्यजीत बच्छाव, अंकित बावणे, अजीम काझी, दिव्यांग हिमगणेकर, सौरभ नवले, मुकेश चौधरी, मनोज इंगळे, राजवर्धन हंगरगेकर, शमशुजामा काझी.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"