विजेतेपदासाठी बरेच अंतर गाठावे लागेल! 

हरमनप्रीतचे धावबाद होणे हे सामन्याचा निकाल बदलणारे ठरले.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 26, 2023 05:30 AM2023-02-26T05:30:24+5:302023-02-26T05:31:26+5:30

whatsapp join usJoin us
A long way to go for the title! | विजेतेपदासाठी बरेच अंतर गाठावे लागेल! 

विजेतेपदासाठी बरेच अंतर गाठावे लागेल! 

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

- अयाज मेमन, कन्सल्टिंग एडिटर 
टी-२० विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत भारतीय महिला संघाने जगज्जेत्या ऑस्ट्रेलियाविरुद्ध झुंजार खेळाचे प्रदर्शन केले. मात्र दुर्दैवाने त्या पराभूत झाल्या. अवघ्या पाच धावांनी झालेला हा निसटता पराभव भारतीयांच्या चांगलाच जिव्हारी लागला आहे. हरमनप्रीतचे धावबाद होणे हे सामन्याचा निकाल बदलणारे ठरले. याच क्षणापासून खऱ्या अर्थाने सामना ऑस्ट्रेलियाच्या बाजूने सरकला. हे दु:ख पचवण्यासाठी कर्णधार हरमनला काही काळ जाऊ द्यावा लागेल.

जेमिमा-हरमनप्रीतने जागवल्या आशा
भारतीय संघ संकटात असताना हरमनप्रीत आणि जेमिमा रॉड्रिग्सने अफलातून खेळ करत भारतासाठी विजय दृष्टिपथात आणला होता.  या दोघींच्या भागीदारीने ऑस्ट्रेलियाचा संघ तणावाखाली आला. चांगल्या फटक्यांच्या साहाय्याने त्यांनी गरजेनुसार आपल्या खेळात बदल केला. जेमिमा बाद झाल्यानंतरही हरमनप्रीत कौरने एक बाजू भक्कमपणे लावून धरली. मात्र मोक्याच्या क्षणी ती दुर्दैवीरीत्या बाद झाल्याने भारतीय डावाला खिंडार पडले. त्यानंतर विकेट्सचा सपाटाच लागला होता.

कणखर               मानसिकतेचा अभाव
एका धावबादपुरते या पराभवाचे वर्णन करून चालणार नाही. कारण मोठ्या रंगमंचावर भारतीय महिला खेळाडूंमध्ये कणखर मानसिकतेचा अभाव सातत्याने दिसतो आहे. मोठे सामने खेळण्यासाठी खेळासोबतच दुर्दम्य आशावादाची गरज भासते. त्यात कुठेतरी आपण कमी पडताना दिसतो. मोक्याच्या क्षणी कच खाण्याच्या वृत्तीमुळे भारतीय महिला संघाने विजेतेपदाच्या संधी गमावल्याची उदाहरणे गेल्या काही वर्षांमध्ये नित्याचीच झाली आहेत. भारतीय चाहत्यांना हे आवडणार नाही. पण वास्तविकतेपासून पळून कसे चालेल.


आघाडीच्या फळीने पुन्हा निराश केले
महत्त्वाच्या सामन्यांमध्ये भारताची आघाडीची फळी पुन्हा एकदा अपयशी ठरली. पण त्याहीपेक्षा दु:ख झाले ते गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण बघून. भारतीय गोलंदाजांमध्ये बळी घेण्याची कुठलीच प्रेरणा दिसत नव्हती. क्षेत्ररक्षकांनीही हात वर केले. त्यामुळे ऑस्ट्रेलियाचा संघ २० ते २५ धावा अधिकच्या उभारू शकला आणि त्याच शेवटी भारताला महागात पडल्या. 


जगज्जेत्यांना नमवण्याची भारतीयांमध्ये धमक
गेल्या काही काळापासून भारतामध्ये महिला क्रिकेटचा स्तर चांगलाच उंचावला आहे. त्यामुळे मोठ्या स्पर्धांच्या उपांत्य आणि अंतिम फेरीत आपण वारंवार धडक देतो आहे. द्विपक्षीय मालिकांमध्ये आपण अनेकवेळा ऑस्ट्रेलियाला पराभूत केले. मात्र आयसीसीच्या स्पर्धांमध्ये आपल्याला त्याची पुनरावृत्ती करण्यात वारंवार अपयश येताना दिसते. त्यामुळे चोकर्सचा शिक्का बसण्यापासून वाचण्यासाठी यावर भारताला तोडगा काढावा लागेल. 

आयसीसी विजेतेपदाचा दुष्काळ कधी संपणार?
केवळ भारतीय महिलाच नाही तर पुरुष संघसुद्धा आयसीसीच्या स्पर्धांमध्ये मोक्याच्या क्षणी कच खाताना दिसतो आहे. त्यामुळेच २०१३ पासून एकही आयसीसीची स्पर्धा जिंकण्यात भारताला यश आलेले नाही. याबाबतीत महिला संघाला थोडी सहानुभूती देता येईल. कारण पुरुष संघाच्या तुलनेत त्यांना खेळण्याच्या संधी कमी मिळतात. मात्र असे असले तरी भारतीय चाहते आयसीसी ट्रॉफीसाठी चांगलेच आसुसलेले आहेत.

अपेक्षांचे ओझे           पराभवाला कारणीभूत
ही गोष्ट तर आपण मान्य करायलाच हवी की इतर देशांच्या तुलनेत भारतीय खेळाडूंवर चाहत्यांचा जास्त दबाव असतो. भारतीय पुरुष आणि महिला क्रिकेटमध्ये एकापेक्षा एक सरस खेळाडूंचा भरणा आहे. पण नुसते चांगले खेळता येणे उपयोगाचे नसते. तर तुमची मानसिकता किती खंबीर आहे, यावरून जय-पराजयाचे अंतर ठरत असते. भारताच्या पुरुष आणि महिला संघाला आयसीसी चषक पटकावण्यासाठी बरीच मजल गाठावी लागेल. ती गाठण्यासाठी खेळाडूंसोबतच प्रशिक्षक आणि बीसीसीआय यांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे.

Web Title: A long way to go for the title!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.