क्रिकेट विश्वामध्ये चर्चेचा विषय ठरणारी भारत आणि ऑस्ट्रेलियाच्या संघामधील बॉर्डर-गावस्कर कसोटी मालिका गुरुवारपासून सुरू होत आहे. या मालिकेतील पहिला सामना नागपूरमध्ये खेळवला जाणार आहे. मात्र या सामन्यापूर्वी ऑस्ट्रेलियन संघाला मोठा धक्का बसला आहे. ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू खेळाडू कॅमरून ग्रीन दुखापतीमुळे पहिल्या कसोटी सामन्याला मुकणार आहे. ऑस्ट्रेलियन फलंदाज स्टीव्हन स्मिथ याने ग्रीनबाबत ही माहिकी दिली आहे.
स्टीव्हन स्मिथने प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना सांगितलं की, कॅमरून ग्रीनने नेट्समध्ये बॅटिंगचा सराव केला नाही. ग्रीनचं नागपूर कसोटीमध्ये खेळणं खूप कठीण आहे. भारत आणि ऑस्ट्रेलियामधील ४ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना ९ फेब्रुवारीपासून नागपूरमध्ये खेळवला जाणार आहे.
कॅमरून ग्रीनबाबत स्टीव्हन स्मिथने सांगितलं की, कॅमरून ग्रीन पहिल्या कसोटीत खेळेल, असं मला वाटत नाही. त्याने नेटमध्ये फलंदाजीही केली नाही. त्यामुळे तो खेळू शकणार नाही, हे मी सांगू शकतो. मात्र त्याबाबत मी खात्रीशीरपणे काही सांगू शकत नाही. आम्ही शेवटपर्यंत तो फिट होण्याची वाट पाहू. मात्र सध्यातरी तो खेळण्याची शक्यता नाही, असे मला वाटते.
नागपूर कसोटीपूर्वी ऑस्ट्रेलियन संघाला बसलेला हा दुसरा धक्का आहे. याआधी वेगवान गोलंदाज जोश हेझलवूडसुद्धा पहिल्या कसोटीमधून बाहेर पडला होता. अशा परिस्थितीत ऑस्ट्रेलियन संघाला हा दुहेरी धक्का आहे. कॅमरून ग्रीन डिसेंबर महिन्यात जखमी झाला होता. तेव्हा दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटीत नॉर्खियाचा चेडू लागून तो जखमी झाला होता. मात्र त्याही परिस्थितीत खेळत नाबाद ५१ धावा बनवल्या होत्या. तसेच पहिल्या डावात ५ विकेट्स घेतले होते.