West Bengal Child Marriage । नवी दिल्ली : पश्चिम बंगालमधील पुरूलिया जिल्ह्यातील एका खेड्यातील मुलीच्या धाडसामुळे तिचा बालविवाह वाचला आहे. खरं तर तिचे आई-वडील बळजबरीने तिचा विवाह करत होते. या दुर्गम खेड्यातील १५ वर्षांच्या मुलीने चाइल्ड लाइनवर फोन करून ही माहिती प्रशासनाला दिली. काशीपूर भागातील पौर्णिमा लोहार ही मुलगी सामाजिक दुष्कृत्यांवर जनजागृती निर्माण करणाऱ्या क्लबची सदस्य आहे. त्यामुळे लग्नासाठी कायदेशीर वय १८ वर्षे आहे हे तिला चांगलेच माहिती होते.
लोहार या मुलीने सांगितले की, ती अनेकदा कोलकातापासून २६० किमी अंतरावर असलेल्या डोबापारा येथील अंगणवाडी केंद्राला भेट द्यायला जायची. तिथेच तिला आशा आणि युनिसेफच्या प्रशिक्षकांकडून बालविवाहाच्या वाईट गोष्टींबाबत माहिती मिळाली. काही महिन्यांपूर्वीच तिला आपला बालविवाह होणार असल्याचे लक्षात आल्यानंतर तिने ताबडतोब १०९८ वर कॉल केला आणि चाइल्ड लाइनला संपूर्ण घटनेची माहिती दिली. खरं तर लोहार हिला शिकून नर्स व्हायचे आहे मात्र तिचे पालक तिच्या संमतीशिवाय जबरदस्तीने तिचे लग्न लावून देत होते.
आई-वडिलांची नाराजी
लोहार हिने काशीपूरमधील अंगणवाडी केंद्रात पीटीआयशी बोलताना सांगितले, "मी चाइल्ड हेल्पलाइनवर कॉल करताच त्यांनी माझे नाव, घराचा पत्ता आणि इतर माहिती विचारली. त्यानंतर प्रशासन आणि पोलीस अधिकारी माझ्या घरी आले आणि मी अल्पवयीन असल्याने माझे लग्न करू नये म्हणून माझ्या आई-वडिलांची समजूत घातली." यामुळे तिचे आई-वडील नाराज झाले आहेत का, असे विचारले असता लोहार म्हणते, "सुरूवातीला ते रागावले होते पण जेव्हा अधिकाऱ्यांनी त्यांना मी अल्पवयीन असल्याचे पटवून दिले. तेव्हा त्यांनी मला अभ्यास चालू ठेवण्याची परवानगी दिली."
मुलीला नर्स व्हायचे आहे
लोहार हिने सांगितले की तिला नर्स बनून लोकांची सेवा करायची आहे. युनिसेफच्या बाल संरक्षण अधिकारी स्वप्नदीपा बिस्वास यांनी सांगितले की, काशीपूर, झाल्डा आणि पुरुलिया जिल्ह्यातील इतर भागांमध्ये बालविवाह रोखण्यासाठी संस्थेने गाव पातळीवर बाल संरक्षण समित्या स्थापन केल्या आहेत. मुलींना मासिक पाळीतील स्वच्छता आणि प्रजनन आणि लैंगिक आरोग्याबाबतही माहिती दिली जात असल्याचे त्यांनी सांगितले.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"
Web Title: A minor girl from West Bengal's Purulia district stopped her child marriage by calling Childline
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.