पाकिस्तानी खेळाडूंचे मैदानावरील सैरभैर वागणे हे काही चाहत्यांसाठी नवीन नाही.. कॅच सोडणे, आपल्याच खेळाडूला शिव्या घालणे, काहीही बरळणे हे नित्याचेच.. त्यात आपल्या त्यांच्यात समन्वय कधी दिसलेच नाही आणि त्यामुळेच आपल्याच खेळाडूला रन आऊट करण्याचे किस्से अनेकदा त्यांच्याकडून घडले. त्यात महिला क्रिकेटपटू तरी बऱ्या असतील असे वाटले होते, परंतु ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्याच वन डे सामन्यात तिथेही घोळ झालेला दिसला. पाकिस्तानला पहिल्या वन डे त यजमानांनी पराभूत केले, परंतु चर्चेत राहिला तो रन आऊटचा प्रसंग..
निदा दार व काइनात इम्तिआज या दोघी खेळपट्टीवर असताना एकमेकींचा ताळमेळ चुकला अन् दोन्ही फलंदाज एकाच एंडला येऊन उभ्या राहिल्या. या वन डे सामन्यात पाकिस्तानला ८ बाद १६० धावा करता आल्या आणि डकवर्थ लुईस नियमानुसार ऑस्ट्रेलियासमोर १५८ धावांचे लक्ष्य ठेवले गेले, जे त्यांनी २८.५ षटकांत २ बाद १५८ धावा करून पार केले. पाकिस्तानकडून निदा दारने ५९ धावा केल्या. ऑस्ट्रेलियाच्या कर्णधार मेग लॅनिंगने ६७ आणि फोएबे लिचफिल्डने नाबाद ७८ धावा केल्या.