Join us  

कसोटी क्रिकेटमध्ये तयार होतोय नवीन भारतीय संघ; आता ५ खेळाडूंचे पुनरागमन होणं कठीण!

यशस्वी जैस्वालच्या शानदार फलंदाजीने एक प्रकारे भविष्याचे संकेत दिले आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2023 10:01 AM

Open in App

जगातील उत्कृष्ट फिरकी गोलंदाज रविचंद्रन अश्विनच्या १२ बळींमुळे भारताने वेस्ट इंडीजचा पहिल्या कसोटीत तिसऱ्याच दिवशी एक डाव १४१ धावांनी सहज पराभव करीत दोन सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी संपादन केली. पदार्पणात १७१ धावांची खेळी करणारा युवा यशस्वी जैस्वाल सामनावीर ठरला. आपला पदार्पण सामना खेळणाऱ्या यशस्वीने १७१ धावांची खेळी केली आणि त्याला सामनावीर म्हणून गौरवण्यात आले. चेतेश्वर पुजाराच्या जागी २१ वर्षीय यशस्वीचा कसोटी संघात समावेश करण्यात आला आणि त्याने संधीचा फायदा घेण्यासाठी वेळ लावला नाही. यशस्वी जैस्वालच्या शानदार फलंदाजीने एक प्रकारे भविष्याचे संकेत दिले आहेत.

आगामी काळात कसोटी क्रिकेटमध्येही निवड समिती युवा खेळाडूंवर अधिक अवलंबून राहू शकतात. अशा स्थितीत टीम इंडियामध्ये आपले स्थान टिकवून ठेवण्यासाठी वरिष्ठ खेळाडूंना चमकदार कामगिरी करत राहावे लागेल. बीसीसीआयने युवा खेळाडूंकडे लक्ष दिल्याने एकेकाळी टीम इंडियाचे स्टार परफॉर्मर असलेल्या खेळाडूंना कसोटी संघात पुनरागमन करणे कठीण होणार आहे. चला अशा पाच खेळाडूंबद्दल जाणून घेऊया ज्यांना आता कसोटी संघात संधी मिळत नाही.

चेतेश्वर पुजारा: 

जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात निराशाजनक कामगिरीनंतर चेतेश्वर पुजाराला संघातून वगळण्यात आले. ३५ वर्षीय पुजारासाठी आता संघात पुनरागमन करणे खूप कठीण असेल. पुजाराला यापूर्वी २०२२ च्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यानंतरही कसोटी संघातून वगळण्यात आले होते. तथापि, कौंटी चॅम्पियनशिपमध्ये ससेक्ससाठी चमकदार कामगिरी केल्यानंतर तो पुन्हा भारतीय संघात परतला होता. भारतीय संघ व्यवस्थापनाने आता तिसर्‍या क्रमांकावर शुभमन गिलचा प्रयत्न करण्याचे ठरवले आहे. गिलने डॉमिनिका कसोटीतही तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी केली होती. पुजाराने भारतासाठी १०३ कसोटी सामन्यांमध्ये ४३.६० च्या सरासरीने ७१९५ धावा केल्या आहेत ज्यात १९ शतके आणि ३५ अर्धशतकांचा समावेश आहे. 

वृद्धिमान साहा: 

महेंद्रसिंग धोनीने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर यष्टिरक्षक फलंदाज रिद्धिमान साहाला यष्टिरक्षक म्हणून खूप संधी मिळाल्या. मात्र, नंतर साहाच्या कारकिर्दीला उतरती कळा लागली. वृध्दिमान साहा शेवटचा सामना २०२१ मध्ये न्यूझीलंडविरुद्ध खेळला होता. ४० कसोटी आणि ९ एकदिवसीय सामने खेळलेला वृद्धिमान साहा ३८ वर्षांचा आहे. केएस भरत, इशान किशन आणि ऋषभ पंतमुळे साहासाठी संघात पुनरागमनाचे दरवाजे बंद झाले आहेत.

इशांत शर्मा: 

एकेकाळी वेगवान गोलंदाज इशांत शर्मा हा कसोटी क्रिकेटमध्ये भारतीय संघाचा महत्त्वाचा सदस्य असायचा, पण आता त्याची कारकीर्द एक प्रकारे संपुष्टात आली आहे. इशांत शर्माने भारतासाठी १०५ कसोटी, ८० एकदिवसीय आणि १४ टी-२० सामने खेळले आहेत. इशांतने कसोटीत ३११, एकदिवसीय सामन्यात ११५ आणि टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यात ८ विकेट घेतल्या आहेत. त्याने नोव्हेंबर २०२१ मध्ये न्यूझीलंडविरुद्ध शेवटचा कसोटी सामना खेळला होता. भारतीय संघ आता युवा वेगवान गोलंदाजांना संधी देत ​​असल्याने ३४ वर्षीय इशांत शर्माचे पुनरागमन होण्याची शक्यता नाही.

करुण नायर: 

वीरेंद्र सेहवाग व्यतिरिक्त फक्त करुण नायरने कसोटी क्रिकेटमध्ये भारतासाठी त्रिशतक झळकावले आहे. मात्र, त्या त्रिशतकानंतर ३१ वर्षीय करुण नायरचा आलेख वाढण्याऐवजी घसरतच राहिला. करुण नायर २०१७ मध्ये भारताकडून शेवटचा सामना खेळला होता. करुण आता देशांतर्गत क्रिकेटही खेळत नाही, त्यामुळे त्याचे पुनरागमन खूप कठीण आहे. करुणने भारतासाठी सहा कसोटी आणि दोन एकदिवसीय सामने खेळले आहेत.

भुवनेश्वर कुमार: 

वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमार गेल्या अनेक महिन्यांपासून आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर आहे. त्याला कसोटी क्रिकेट खेळून पाच वर्षांहून अधिक काळ लोटला आहे. आता भुवीचे टीम इंडियात पुनरागमन खूप कठीण दिसत आहे. २०१३ मध्ये भारताकडून पदार्पण केल्यानंतर भुवनेश्वर सतत दुखापतींशी झुंज देत आहे. ३३ वर्षीय भुवीने केवळ २१ कसोटी सामने खेळले आहेत. यादरम्यान त्याने २६.१ च्या सरासरीने ६३ विकेट घेतल्या.

टॅग्स :भारत विरुद्ध वेस्ट इंडिजबीसीसीआयभारत
Open in App