नवी दिल्ली : भारतीय संघाने शनिवारी झालेल्या अखेरच्या ट्वेंटी-20 सामन्यात विजय मिळवून पाहुण्या श्रीलंकेला पराभवाची धूळ चारली. मालिकेतील पहिला सामना भारताने तर दुसरा सामना श्रीलंकेने जिंकला होता. मात्र, अखेरच्या सामन्यात विजय मिळवून हार्दिक सेनेने विजयरथ कायम ठेवला आहे. हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली भारताच्या 'यंग ब्रिगेड'ने तिसऱ्या आणि अखेरच्या ट्वेंटी-20 सामन्यात श्रीलंकेच्या संघाला 91 धावांच्या मोठ्या फरकाने पराभूत केले आणि मालिका 2-1 ने जिंकली.
सूर्यकुमार यादवने केलेली 112 धावांची नाबाद खेळी आणि त्याला भारतीय गोलंदाजांची मिळाली शिस्तबद्ध साथ यांच्या जोरावर भारतीय संघाने श्रीलंकेला पराभूत केले. भारतात श्रीलंकेने आतापर्यंत कधीही ट्वेंटी-20 मालिका जिंकलेली नाही, त्यामुळे हार्दिकच्या नव्या दमाच्या संघाने ही परंपरा कायम ठेवत भारताचा विजय निश्चित केला.
किंग कोहलीकडून 'विराट' कौतुकसूर्याची शतकी खेळी पाहून भारतीय संघाचा दिग्गज विराट कोहली देखील प्रभावित झाला. त्याने त्याच्या इंस्टाग्रामवर स्टोरी ठेवून सूर्याच्या खेळीचे विशेष कौतुक केले. खरं तर सूर्यकुमार यादव जेव्हा मैदानात आला तेव्हा पॉवरप्ले संपला होता. त्यामुळे सावधपणे डाव पुढे नेण्याची भारताची भूमिका होती. पण सूर्यकुमारने मात्र खेळपट्टीचा अंदाज घेतला आणि मग जोरदार धुलाई सुरू केली. सगळ रेषेतील फटके तर त्याने मारलेच पण त्यासोबतच लॅप शॉट मारून त्याने वेगवान गोलंदाजांची सारी हवाच काढून टाकली. चेंडू थोडा जरी अंगावर आला तरी सूर्यकुमार यादव त्या चेंडूवर लॅप शॉट मारताना दिसला. त्यानंतर गोलंदाजाने लाईन बदलली तर सुर्यकुमार सरळ रेषेत किंवा आडव्या बॅटने फलंदाजी करत होता.
कौतुक पाहताना आनंद गगनात मावेना! सूर्याच्या ताबडतोब खेळीमुळे श्रीलंकेचे गोलंदाज हतबल झाल्याचे दिसले. याच दरम्यान सूर्यकुमार यादवने ट्वेंटी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 44 सामन्यांच्या 42 डावांमध्ये 1466 धावा केल्या होत्या. काल त्याने दमदार शतक ठोकत 1500 धावांचा टप्पा ओलांडला. 7 चौकार आणि 9 षटकारांच्या जोरावर त्याने नाबाद 112 धावा कुटल्या. त्यानंतर विराट कोहलीने आपल्या इन्स्टाग्रामच्या स्टोरीवर सुर्यकुमार यादवचा फोटो शेअर केला आणि अप्रतिम खेळी खेळल्याबद्दल टाळ्या वाजवण्याचे इमोजीदेखील वापरले. विराट कोहलीने ठेवलेली स्टोरी पाहताना सूर्यकुमार यादवची रिॲक्शन पाहण्यासारखी आहे. सूर्या किंग कोहलीच्या स्टोरीला प्रतिक्रिया देतानाचा फोटो समोर आला आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"