imam ul haq marriage : वन डे विश्वचषकातील खराब कामगिरीनंतर पाकिस्तानी संघ टीकाकारांच्या निशाण्यावर आला. माजी खेळाडूंच्या सततच्या आरोपांनंतर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने ठोस पावले उचलत काही धाडसी निर्णय घेतले. नियमित कर्णधार बाबर आझमने तिन्ही फॉरमॅटमधून कर्णधारपदाचा राजीनामा दिल्यानंतर शान मसूदकडे पाकिस्तानच्या कसोटी संघाची धुरा सोपवण्यात आली आहे. तर शाहीन आफ्रिदी पाकिस्तानच्या ट्वेंटी-२० संघाचा कर्णधार बनला.
पाकिस्तानला विश्वचषकात ९ सामन्यांपैकी केवळ ४ सामने जिंकता आले. अफगाणिस्तानसारख्या नवख्या संघाकडून देखील शेजाऱ्यांना पराभव पत्कारावा लागला. स्पर्धेबाहेर झाल्यानंतर बाबर आझम हताश दिसला. पण, आता बाबर त्याच्या सहकारी खेळाडूच्या लग्नाच्या कार्यक्रमात रमल्याचे दिसले. खरं तर पाकिस्तानचा सलामीवीर इमाम-उल-हक शनिवारी विवाहबंधनात अडकणार आहे, त्यासाठी कव्वाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, ज्यात बाबर आझमसह पाकिस्तानी खेळाडू नोटा उधळताना दिसले.
कव्वाली कार्यक्रमात नोटांची उधळणपाकिस्तानचा मावळता कर्णधार बाबरने कर्णधारपदाचा राजीनामा दिल्यानंतर, पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने नवीन कर्णधारांची नियुक्ती केली. मोहम्मद हफीजला नवा संघ संचालक तर वहाब रियाजला मुख्य निवडकर्ता बनवण्यात आले. एकूणच विश्वचषकातील खराब कामगिरीचा असा परिणाम झाला की पाकिस्तान क्रिकेटची संपूर्ण रचनाच बदलून गेली. दरम्यान, बाबर आझमचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये बाबर आझमवर पैशांचा वर्षाव होत असल्याचे दिसत आहे.
पाकिस्तानी संघाचा सलामीवीर इमाम-उल-हक नव्या इनिंगची सुरूवात करत आहे. यासाठी कव्वाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात पाकिस्तानचा माजी कर्णधार आणि इमामचा जवळचा सहकारी बाबर आझम उपस्थित होता. बाबरसोबत पाकिस्तानचा माजी कर्णधार सरफराज अहमद, मोहम्मद हफिज, वहाब रियाज हे देखील कव्वाली कार्यक्रमासाठी उपस्थित होते. यादरम्यान क्रिकेटपटूंसह उपस्थितांनी बाबरवर नोटांची उधळण केली, ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.