रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने तिसऱ्या ट्वेंटी-२० सामन्यात वेस्ट इंडिजवर विजय मिळवून मालिका ३-० अशी खिशात घातली. भारताचा हा सलग ९वा ट्वेंटी-२० विजय आहे. अफगाणिस्तान व रोमानिया यांच्या नावावर सलग १२ सामने जिंकण्याचा विक्रम आहे. पूर्णवेळ कर्णधार झाल्यानंतर रोहितच्या नेतृत्वाखाली भारताने सलग तिसऱ्या मालिकेत निर्भेळ यश मिळवले आहे. त्यांनी न्यूझीलंडविरुद्ध ट्वेंटी-२० मालिका ३-० अशी जिंकली आणि वेस्ट इंडिजविरुद्ध वन डे व ट्वेंटी-२० मालिकेत निर्विवाद वर्चस्व गाजवले.
भारताचा कर्णधार म्हणून पहिल्या २५ ट्वेंटी-२० सामन्यांत रोहित शर्माने सर्वाधिक २१ विजयांची नोंद केली आहे. त्यानंतर विराट कोहली ( १६) व महेंद्रसिंग धोनी ( १४) यांचा विक्रम येतो. घरच्या मैदानावर सर्वाधिक ट्वेंटी-२० सामने जिंकणारा रोहित हा भारताचा यशस्वी कर्णधार ठरला आहे. त्याने १४ विजय मिळवताना विराट कोहलीचा १३ विजयांचा विक्रम मोडला. इंग्लंडचा इयॉन मॉर्गन ( १५), न्यूझीलंडचा केन विलियम्सन ( १५) व ऑस्ट्रेलियाचा आरोन फिंच ( १४) हे आघाडीवर आहेत. पण, या विजयामुळे टीम इंडियाने इंग्लंडला धक्का दिला आहे.