Join us  

पाकिस्तानला धक्का; चॅम्पियन्स ट्रॉफीचे आयोजन यूएईत?

आशिया चषक क्रिकेटपाठोपाठ चॅम्पियन्स ट्रॉफी क्रिकेट २०२५चे आयोजनदेखील पाकिस्तानात होणार नाही. एकतर या स्पर्धेचे यजमानपद पाककडून काढून घेतले जाईल किंवा पाकच्या यजमानपदाखाली हायब्रीड मॉडेलनुसार ही स्पर्धा यूएईत आयोजित होण्याची दाट शक्यता वर्तविली जात आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 28, 2023 10:16 AM

Open in App

कराची : आशिया चषक क्रिकेटपाठोपाठ चॅम्पियन्स ट्रॉफी क्रिकेट २०२५चे आयोजनदेखील पाकिस्तानात होणार नाही. एकतर या स्पर्धेचे यजमानपद पाककडून काढून घेतले जाईल किंवा पाकच्या यजमानपदाखाली हायब्रीड मॉडेलनुसार ही स्पर्धा यूएईत आयोजित होण्याची दाट शक्यता वर्तविली जात आहे.

भारतानेपाकिस्तानात खेळण्यास नकार देणे हे यामागील मोठे कारण सांगितले जाते. माध्यमांमधील वृत्तानुसार, यूएईत स्पर्धेचे आयोजन होऊ शकेल.  पाकने यावर आक्षेप नोंदविल्यास हायब्रीड मॉडेलनुसार आयोजन करावे लागेल.  भारताने आशिया चषक स्पर्धेच्या वेळीदेखील संघ पाठविण्यास नकार दिल्याने हायब्रीड मॉडेलनुसार स्पर्धा पार पडली होती. चॅम्पियन्स ट्रॉफीसाठीही बीसीसीआयने ताठर भूमिका कायम ठेवल्याने पीसीबीच्या अडचणीत भर पडली.

पीसीबीने आयसीसीकडे चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५च्या यजमानपद अधिकारांवर स्वाक्षरी करण्याचा आग्रह धरला. भारताने राजकीय किंवा सुरक्षेचे कारण देत पाकिस्तानात खेळण्यास नकार दिला तर त्यांनी पीसीबीला मोठी नुकसानभरपाई द्यावी, अशी पीसीबीची मागणी आहे. पाककडे यजमानपदाचा अधिकार असला तरी आयसीसीने अद्याप यजमानपद समझोत्यावर स्वाक्षरी केलेली नाही. पीसीबी प्रमुख जका अश्रफ आणि सीओओ सलमान नसीर यांना फेब्रुवारी- मार्च २०२५ला होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफी यजमानपदावर चर्चा करण्यासाठी अहमदाबादला झालेल्या आयसीसी बोर्डाच्या बैठकीत पाचारण करण्यात आले होते.

या बैठकीत पीसीबीने आयसीसीकडे असाही आग्रह केला की भारताचा सुरक्षेविषयी आक्षेप असेल तर आंतरराष्ट्रीय दर्जाच्या स्वतंत्र सुरक्षा यंत्रणेकडून पाकमधील सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेता येईल. अन्य संघ पाकमध्ये खेळण्यास तयार आहेत. बीसीसीआय मात्र आढेवेढे घेत असल्याने हा पेच आयसीसीने सोडवायला हवा.

टॅग्स :आयसीसीपाकिस्तानसंयुक्त अरब अमिरातीभारत