नवी दिल्ली : आधुनिक क्रिकेटमध्ये अविश्वसनीय पॉवरहिटिंगमुळे खेळाचे स्वरूप एकतर्फी होताना दिसत आहे. फलंदाजीचा विकास होत असताना स्टेडियमचा आकार मात्र लहान होत आहे. लहान सीमारेषा कालसुसंगत नसल्याचे मत अनुभवी ऑफस्पिनर रविचंद्रन अश्विन याने व्यक्त केले. यंदा आयपीलएमध्ये विविध संघांकडून धावडोंगर उभारण्यात आला. त्यासंदर्भात अश्विनने हे वक्तव्य केले.
हैदराबादने दोनदा २७७ आणि त्यानंतर २८७ धावा उभारल्या. इम्पॅक्ट प्लेअरच्या नियमानंतर अनेक संघ २५० वर धावा करीत आहेत. काही वर्षांआधी तयार करण्यात आलेले स्टेडियम आता कालबाह्य ठरताना दिसतात. त्यावेळी ज्या बॅटचा वापर केला जायचा, त्या बॅट आता गल्ली क्रिकेटमध्येदेखील वापरल्या जात नाहीत. प्रायोजकांसाठी एलईडी स्क्रीनचा वापर होत असल्याने आधीच समारेषा दहा फूट कमी झाली. असेच सुरू राहिल्यास काही वेळानंतर खेळाचे स्वरूप एकतर्फी झालेले असेल, असे अश्विन म्हणाला.
अश्विनच्या मते, ‘आजचा खेळ कोणाला खूश तर कोणाला दुखावणारा आहे. गोलंदाजांना मानसिक प्रोत्साहन देण्याची खरी गरज आहे. अशा स्थितीत चांगला गोलंदाज मात्र स्वत:ची ओळख निर्माण करीत कौशल्य सिद्ध करू शकेल. खेळातील संतुलन बदलले की आपल्यालादेखील त्यावर तोडगा शोधावा लागतो. स्वत:ला इतरांपेक्षा वेगळा दाखवून देण्याची हीच संधी असते.’